
पुणे- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता आहे. या अंतर्गत वादांमुळे राज्य मागासवर्ग आयोगातील तिसऱ्या सदस्याने राजीनामा दिला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हाके यांनी आपल्या राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठविली होती.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सध्या राज्यात वाद सुरु आहे. या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु आहे. या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगही चर्चेत आला आहे. यापूर्वी प्रा. डॉ. संजीव सोनावणे आणि बालाजी किल्लारीकर या दोन सदस्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हे दोन्ही राजीनामे अद्याप स्वीकारले गेले आहेत किंवा नाही, हे स्पष्ट नाही. बालाजी किल्लारीकर यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान आता हाके यांनीही राजीनामा दिलाय. १ डिसेंबर रोजी आयोगाच्या बैठकीमधील माझ्या व आयोगाच्या वैचारिक मतभेदामुळे व्यथित होऊन मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने मर्यादित सर्वेक्षण करावे, अशी काही जणांची भूमिका आहे. मात्र, बालाजी किल्लारीकर यांनी फक्त मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण न करता सर्व समाजांचे सर्वेक्षण करावे, असा आग्रह धरला होता. मात्र, हा प्रस्ताव न स्वीकारल्याने बालाजी किल्लारीकर यांनी आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देऊ केला होता. तसेच किल्लारीकर यांनी जातनिहाय जनगणेचा आग्रहदेखील लावून धरला होता.