

महिलांना ३ हजार आणि मोफत बस प्रवास
मुंबई (Mumbai) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मविआच्या या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला. विकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात १०० दिवसांचा अजेंडा जाहीर केला. या महाराष्ट्रनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा, महिलांना मोफत बस प्रवास, लाडकी बहीण योजनेऐवजी महालक्ष्मी योजना आणणार असून महिलांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये, शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ तसेच बेरोजगार युवकांना दर महिन्याला चार हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रनाम्यातील घोषणा….
१) महालक्षी योजनानुसार महिलांना तीन हजार प्रतिमहिना देणार
२) महिलांसाठी बस प्रवास मोफत करणार
३) ६ गॅस सिलिंडर प्रत्येकी ५०० रुपयांत उपलब्ध करून देणार
४) महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार
५) महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये २ दिवसांची ऐच्छिक रजा देणार
६) जन्मलेल्या प्रत्येत मुलीच्या नावे ठरावीक रक्कम बॅंकेत ठेवणार, १८ वर्षांनंतर लाख रुपये देणार
७) सुशिक्षित बेरोजगारांना दरमहिना ४ हजार रुपयांपर्यंत भत्ता देणार
८) शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्जमाफी देणार
९) नियामित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत सूट देणार
१० ) राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु कऱणार
११) एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करून ४५ दिवसांत निकाल जाहीर करणार
१२) महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेणार
१३) संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दीड हजारांऐवजी २ हजार देणार
१४) ३०० युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचे १०० युनिटपर्यंतचे वीजबील माफ करणार
१५) सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
१६) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
१७) महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
१८) महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील याना भारतरत्न देण्याची मागणी करणार
१९) शिवभोजन थाळी योजना केंद्राची संख्या वाढणार
२०) सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करून देणार
२१) राज्यात सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार