कापसाला नको, रुईला प्रतिकिलो हमीभाव जाहीर करा-जावंधिया

0

नागपूर : कापसासाठी नाही तर रुईसाठी प्रतिकिलो हमीभाव जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते व शेतीतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी सरकारकडे केली आहे. ( Vijay Jawandhia on Cotton Price) केंद्र सरकारने अलिकडेच विविध पिकांसाठी हमीभाव जाहीर केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी पुढे आली आहे. कापसासाठी प्रति क्विंटल हमीभावाऐवजी अमेरिकेच्या धर्तीवर रुईसाठी प्रतिकिलो हमीभावाची मागणी त्यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो, असा दावा त्यांनी केलाय.

केंद्र सरकारने अलिकडेच पिकांसाठीचे हमीभाव जाहीर केले असून यात कापसासाठी प्रतिक्विंटल सहाशे वीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता कापसाचा हमीभाव हा प्रति क्विंटल सात हजार रुपये झाला आहे. मात्र, या दरावर शेतीतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली असून कापसाला प्रति क्विंटल हमीभाव देण्याऐवजी रुईसाठी प्रति किलो हमीभाव जाहीर केला पाहिजे, अशी मागणी जावंधिया यांनी केली आहे. गेल्या काही वर्षात शेती क्षेत्रातील नवीन संशोधनामुळे कापसाचे अनेक नवीन वाण जास्त रुई उत्पादन देऊ लागले आहेत. जास्त रुई उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.