भारत हरल्याचा राग, भावाचा खून

0

अमरावती : वर्ल्ड कपमधील भारतीय संघाचा हा पराभव अनेक क्रिकेट वेड्यांच्या जिव्हारी लागला असून यातून एका मोठ्या भावाने दारुच्या नशेत लहान भावाचा खून केल्याची व वडीलांना जखमी केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात अंजनगाव बारी गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण इंगोले (वय ३२) नावाच्या युवकाला अटक केली आहे. मटण खाऊन आल्याने भारत सामना हरला, असा त्याचा लहान भावावर आक्षेप होता व त्यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. (Amravati murder)
रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. अंजनगाव बारी गावात इंगोले कुटुंबीय घरी मद्यपान करीत हा सामना पहात होते. वडील व लहान भाऊ मटण खात होते. भारत हरल्यावर त्यांच्यात वाद सुरु झाले. लहान भाऊ अंकित (वय २८) हा मटन खाऊन आल्यामुळे भारत हरला, असा आरोप प्रवीणने त्याच्यावर केला. यात वडील रमेश यांनी आक्षेप घेतल्यावर प्रवीणने दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यात लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रवीणला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे.