investment :केंद्राकडून एक लाख कोटींची गुंतवणूक

0

महाराष्ट्र उद्योगात अग्रेसर – मिलिंद देवरा

मुंबई (Mumbai), 18 ऑगस्ट केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मदतीचा हात सढळ सोडला असून गेल्या चार महिन्यात एक लाख कोटींची गुंतवणूक राज्यात झाली आहे. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात देशात अग्रेसर ठरला आहे. मेट्रो प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबई एमएमआर रिजनमध्ये विणले जात असल्याचे शिवसेना खासदार मिलिंद देवरा (Shiv Sena MP Milind Deora) यांनी सांगितले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने राज्याला काय दिलं असे विचारणाऱ्या विरोधकांवर खासदार देवरा यांनी सडेतोड उत्तर दिले.

मागील चार महिन्यांत वाढवण बंदरासह विविध प्रकल्पातून महाराष्ट्राला एक लाख कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. खासदार देवरा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पुणे आणि ठाण्याच्या मेट्रो प्रकल्पांना १५ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. मेट्रो प्रकल्पांचा विस्तार मुंबई आणि पुणे शहरासाठी गेमचेंजर ठरणार आहेत. जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे महाराष्ट्रात आहे याचा आम्हाला गर्व असल्याची भावना खासदार देवरा यांनी व्यक्त केली.

काही लोक सत्तेत असताना मेट्रोला विरोध करत होते, मात्र एमएमआर भागातील रहिवाशांच्या वेदना दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने शहरात अत्याधुनिक वाहतूक प्रणाली विकसित होत आहे. येत्या काळात एमएमआर क्षेत्रात 14 मेट्रो लाईन अस्तित्वात येतील. ज्यातून मुंबई महानगरातील नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुखकर होईल, असा विश्वास खासदार देवरा यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस उबाठाला पसंती देणार नाही

महाविकास आघाडीत सध्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन रस्सीखेच सुरु आहे. यावर खासदार देवरा म्हणाले की काँग्रेसची कार्यपद्धती मला चांगलीच माहित आहे. ते कधीही उद्धव ठाकरे यांच्या नावाला सहमती देणार नाहीत, असे खासदार देवरा म्हणाले.