

रसिकांचा एकांकिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर (Nagpur), 13 ऑगस्ट
भूतकाळात अडकलेले इगोइस्टिक लेखक आणि रंगभूमीवर काहीतरी करू पाहणाऱ्या नवोदित लेखकाची जुगलबंदी ‘इंट्रोगेशन’ या एकांकिकेतून अप्रतिमरित्या सादर करण्यात आली. चिटणीस सेंटरच्या टमम्रिड हॉलमध्ये संजय भाकरे फाउंडेशनने अभिव्यक्ती या मालिकेअंतर्गत ही एकांकिका सादर केली.
एक नाटक करून त्याच्या भरोशावर आयुष्यभर स्वतःची थोरवी गाणारे अनेक कलावंत आजही रंगभूमीवर वावरत आहेत. असे लोक नेहमी नवीन कल्पकतेने काहीतरी करू पाहणाऱ्या तरुण कलाकारांचे मानसिक खच्चिकरण करू पाहतात आणि त्यांच्यातल्या दिग्दर्शक, लेखकाला उमलण्याआधीच चुरगळून टाकतात.
नवीन लेखकांमध्ये तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार यांच्यासारखा स्पार्क असावा, असा अट्टाहास असणारे ग्रेट अजूनही मार्गदर्शक म्हणून मिरवीत आहेत. एकाच लेखकाची दोन नाटके एकसारखे नसतात, तर दोन लेखकांची नाटकं एक सारखी कशी असेल? अशातच जेव्हा नवीन लेखकांना त्याच जुन्या माईलस्टोन नाटकांच्या चौकटीत बसू पाहतात. ही खरी नव्या लेखकांची गळचेपी आहे. जुन्या पिढीचा लेखक म्हणून ऋषिकेश निखार आणि नवोदित लेखक म्हणून आदित्यने आपल्या अभिनयाचे कंगोरे दिग्दर्शकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर सादर केले.
नेपथ्य सतीश काळबांडे यांचे तर प्रकाशयोजना बाल्या लारोकर यांची होती. नाटकाला साजेस संगीत भावेश खानोरकर यांनी दिले होते. निर्मितीची बाजू अनिता भाकरे यांनी सांभाळली त्यांना गीता सोहनी आणि परेश महाजन यांनी सहकार्य केले.
याप्रसंगी चिटणीस सेंटरचे ट्रस्टी विलास काळे, ज्येष्ठ दिग्दर्शक नीलकांत कुलसंगे, विवेक खेर, अतुल भुसारी यांची उपस्थित होती. त्यांनी कलाकारांचे भरभरून कौतुक केले. रसिकांचा एकांकिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.