

(Mumbai)मुंबई-मंत्रालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याच्या निनावी फोनमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ माजली होती. पोलिसांनी परिसर व इमारतीची कसून तपासणी केली. मंत्रालय उडवून देण्याची मागील पंधरा दिवसातील ही दुसरी घटना असून पोलिसांनी धमकी देणाऱ्याची ओळख पटविली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण ढाकणे असे फोन करून मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो अहमदनगरचा रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याने धमकी का दिली, हे अद्याप स्पष्ट नाही.
तथापि, खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पोलिसांचे श्वान पथक व बॉम्ब शोध पथकाने देखील मंत्रालय परिसराची तपासणी केली. मंत्रालयात येणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. तपासणीत पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे मंत्रालय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असे पोलिसांनी सांगितले.