एका कार्यकर्त्याचे आंबेडकरांना खुले पत्र!

0

 

बाळासाहेब, ही शेवटची संधी !
जेष्ठ पत्रकार- बंधुराज लोणे
( बाळासाहेबांना खुलं पत्र )

आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar)
सविनय जयभीम
ते वर्ष होत १९८४. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादला मी शासकीय वसतीगृहाचा विद्यार्थी होतो. पहिल्यांदा आपल्याला इथे बघितलं होतं. माझ्या बापाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा बघितलं होतं. मी बाबासाहेबच्या नातवाला बघितलं याचा मला भारी आनंद झाला होता. मी माझ्या बापाला पत्र पाठवून याची माहिती दिली होती.

बाळासाहेब यानंतर बऱ्याच वर्षनी मी पत्रकार म्हणून आपली अनेकदा भेट घेतली. आपल्या मुलाखती घेतल्या. एकदा तर एका वृत्त वाहिनीच्या चर्चेत आपल्यासोबत माझा वाद झाला. आपण माझी थेट लायकी काढली होती. त्या आधी १९९७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात आपण इतर रिपब्लिकन नेत्यांना विश्वासात न घेता भाजप पुरस्कृत उनेदवाराला पाठिंबा दिला होता. तेव्हा मी दै. महानगर मध्ये होतो. या संदर्भात मी दिलेली सविस्तर बातमी संपादक निखिल वागळे यांनी हेडलाईन केली होती. या बातनीचा मथळा होता, ” प्रकाश आंबेडकरांचा भाजपशी सौदा ”
तेव्हा आपले तत्कालीन मुंबई अध्यक्ष सुदास जाधव यांनी महानगरवर मोर्चा आणला होता आणि आपणही वागळेंना न्यायालयीन कारवाईची नोटीस पाठवली होती. त्या आधी १९९३ मध्ये आपण बहुजन महासंघाची स्थापना केली. शेगावला अधिवेशन आयोजित केलं होतं. याच वार्तांकन करण्यासाठी मला इथे वागळेंनी पाठवलं होतं.

त्यानंतर अकोला मतदार संघातून आपण विजयी होण, अकोला जिल्ह्यात आपण केलेले जाती समुहाचे वेगवेगळे प्रयोग वगैरे मी आणि महाराष्ट्राने बघितले आहेत. त्याआधी किनवट विधानसभा पोट निवडणुकीत भीमराव केरामसारख्या साध्या कार्यकर्त्याला आमदार करण, रिपब्लिकन एक्य फुटल्यानंतर नांदेडला सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेलं भव्यदिव्य अधिवेशन, नामांतर प्रश्नावर आपण घेतलेली रोखठोक भुमिका, भावनिक प्रश्नापेक्षा मुलभूत प्रश्नांवर आपण उभे केलेले लढे याचा पत्रकार आणि एक कार्यकर्ता म्हणून मी साक्षीदार आहे. बाळासाहेब आपण आरएसएसचं विश्लेषण करणारा एक अभ्यासपूर्ण लेख लोकसत्तेत लिहिला होता. ( माझ्याकडे कदाचित असेल ते कात्रण) त्यानंतर सातत्यानं आपण संघ परिवार आणि भाजपविरोधात ठाम भुमिका घेतलेली आहे. याचा माझ्या सारख्याना नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. आपल्यावर सार्वजनिक, किवा एखाद्या बैठकीत टिका झाली की हा सारा इतिहास सांगून माझ्यासारखे अनेकजण आपली पाठराखण करीत असतात.

बाळासाहेब हे मान्यच करावं लागेल की आंबेडकरी चळवळीला आपण एका वेगळ्या उंचीवर आणि वळणावर नेलं. बाबासाहेबांनंतर आंबेडकरी चळवळ, पक्ष आपण जातीच्या कक्षेबाहेर नेण्याचा यशस्वी प्रयोग केला. भारतीय रिपब्लिकन पक्ष बरखास्त करुन वंचित बहुजन आघाडी स्थापण करण्याचा आपण धाडसी निर्णय घेतला.

बाळासाहेब आपलं वाचणं, चिंतन, आंतरराष्ट्रीय प्रश्नची आपली जाण,आंबेडकरी विचाराची आपली समज, पकड याचं मला नेहमीच कौतुक आणि अभिमान वाटत असतो. आपण स्वाभीमानी नेते आहात, स्वाभीमानाचं राजकारण करता असा आपल्या कार्यकर्त्यांचा दावा असतो, मलाही तसचं वाटतं पण काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरे शोधावी लागातील.
बाळासाहेब मला माहिती आहे की संघाने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर अनेकदा कुजबुज मोहिम राबवलेली आहे. मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमातुन आपली बदनामी केलेली आहे.

पण आपण ताठपणे त्याचा सामना केला आहे. इतर रिपब्लिकन नेत्यांच्या तुलनेत आपलं रहाणीमान अगदी साध आहे. अनेकदा उच्च न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन पर्यंत आपण चालत येताना बघितलं आहे. मीही एक दोन वेळा आपल्यासोबत गप्पा मारत आलेलो आहे. आपलं पक्ष कार्यालयही अगदी साधच आहे. पत्रकारांना आपण फारसा भाव कधी देत नाही, उलट या जमातीविषयी आपल्या मनात एक तुच्छताभाव असतो. कधीकाळी आपल्या पक्षात कार्यकर्त्यांचे शिबीर वगैरे घेतली जात होत होती. आपल्या पक्षाची राजकिय व्यवहार समिती होती. या समितीत बऱ्यापैकी चर्चा व्हायची, अशी माझी माहिती आहे. बौद्धापेक्षा इतर समाजाकडे नेतेपद देणं, एका महिलेला प्रमुखपद देणं,असे प्रयोग आपण जाणीवपूर्वक केले आहेत.

१९८३ ते आजवरच्या आपल्या कारकिर्दीचा आढावा घेतला तर एक गोष्ट ठळकपणे दिसते की आपले सोबती फार काळ आपल्यासोबत राहत नाहीत किवा आपण त्यांना ठेवत नाही. आपल्या सुरुवातीचा काळ्यात आपण डाव्या आघाडीचं नेतृत्व केलं. व्ही पी सिंगाने आपली राज्यसभेवर केलेली नेमणूक, रिडल्स प्रकरणी आपण उभा केलेला लढा, त्यानानंतर काँग्रेससोबत ( खरं तर शरद पवारांसोबत) न जाण्याचा आपला निर्णय पण काही वर्षातच विलासराव देशमुख सरकारमध्ये सहभागी होण्याचा आणि बाहेर पडण्याचा ठराव , गेल्या निवडणुकीत वंचितचा प्रयोग अशा काही प्रमुख नोंदी करता येतील.
बाळासाहेब महाराष्ट्रातील मतदार संघ आणि जातीय समिकरण मुंडे, महाजन, शरद पवार यांच्पापेक्षा थोडा जास्तच आपला अभ्यास आहे. गेल्या तीन दशकात आपलं कायम काही टक्के मतांवर वर्चस्व राहिलेलं आहे. मतं ट्रान्सफर करण्याची ताकद आपल्याकडे आहे. या काळात दहा पंधरा आमदार आपण निवडून आपले आहेत. कोणाला पराभूत करण्याची ताकद आपण बाळगून आहात. कांशीरामजी म्हणायचे की आधी कोणाला पाडण्याची ताकद असेल तर आपण जिंकण्याचा डाव खेळू शकतो. बाळासाहेब गेल्या तीन दशकात आपण जिंकण्याचा डाव मात्र खेळू शकले नाही. आणि मग स्वतंत्रपणे लढून आम्ही आमचा पक्ष बांधायचा नाही का ? आमची ताकद वाढवायची नाही का, या युक्तीवादाला आधार राहत नाही. आपला कार्यकर्ता, पाठीराखा कमिटेड आहे. तो प्रत्येक निवडणुकीत त्याग करतो. घरचं खाऊन पक्षासाठी , आपल्या नेत्यासाठी, स्वाभीमानी आंबेडकरी चळवळीसाठी झटत असतो. पण बाळासाहेब त्यांच्या त्यागाचं मोल होत नाही. प्रत्येक निवडणुकीत आपण किती ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर आहोत, याची मोजदाद करत, यावर समाधान मानत पुढील निवडणुकीत आपली सत्ता येणार, किमान बाळासाहेब किंगमेकर होतील अशी अशा बाळगून कामाला लागतो. आता हे किती वर्ष, किती निवडणुका चालणार ? बाळासाहेब माझ्यासह आपल्यावर प्रेम करणाऱ्या, आपला आदर करणाऱ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे.

आपण संघाच्या विरोधात प्रखर वैचारिक भुमिका घेता , सनातनी हिंदू आणि वारकरी हिंदू ही आपली मांडणी , भुमिका रुजली तर राजकिय आणि सामाजिक क्रांती होईल पण संसदीय राजकारणात संख्याच बोलत असते. तिकडे कांशीराम यांनी अतिशय सरंमजामी प्रदेशात सत्ता हस्तगत केली , एका महिलेला मुख्यमंत्री केलं , बाळासाहेब हे यश आपल्याला का शक्य झालं नाही ?

बाळासाहेब, आपण पक्ष बौध्देत्तेराच्या बाहेर नेलात पण मधल्या काळात बौद्धांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं, राजकारणातून हा समाज असोलेट झाला, बौध्दांची निर्णायक ताकद संपली. याचाही विचार आपण करणार की नाही ? आतापर्यंत आपण निवडून आणलेल्या आमदारांत एकही बौद्ध नाही. इतर समाजासाठी आंदोलनं आम्हीच करायची आणि त्यागही आम्हीच करायचा ? बाळासाहेब, मंडल अहवालाच्या अंमलबजावणीला शिवसेनेने विरोध केला, भाजपनं षडयंत्र केलं, व्ही पी सिंगाच सरकार पाडलं पण महाराष्ट्रात या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी आपण यशस्वी लढा उभारलात. ( ना. ग. गोरे, निळकंठ खाडिलकर, शरद यादव यांची आपण आयोजित केलेल्या सभेचं वार्तांकन मी केलेलं आहे. ) पण मंडलचा फायदा घेणाऱ्या जाती आपल्यासोबत आल्या नाहीत. तर मग याला पर्याय काय ? वंचितचा प्रयोग याला पर्याय असेल तर ते आकडेवारीत दिसलं पाहिजे. बाळासाहेब आपणाला राष्ट्रीय वलय आहे, ओळख आहे, आपली क्षमता आहे पण आपण राष्ट्रीय राजकारणात हस्तक्षेप केला नाही , क्षमता असुनही आपण राष्ट्रीय नेते का झाला नाहीत ?
बाळासाहेब आता मी थेट कळीच्या मुद्यावर बोलतो. प्रत्येक निवडणुकित मतदार संघ , उमेदवार निवडीचे आपले निकष काय असतात हे एक मोठं कोडं आहे. आता गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदार संघात आपण कोण तो पडळकर नावाचा उमेदवार दिला. तो त्या मनोहर भिडेच्या संपर्कात असलेला आणि संघाची बांधिलकी मानणारा.. त्याच्यामुळे तिथं भाजपचा विजय झाला. लोकसभा निवडणूक संपताच तो भाजपत गेला आणि आता भाजपचा आमदार आहे. या पडळकरचा आणि वंचितचा काय संबंध ? अशी प्रत्येक निवडणुकीतील अनेक उदाहरणे देता येतील. उमेदवारी देताना आपल्या कार्यकर्त्यापेक्षा आपण वेगळ्याच मेरिटचा विचार करता आणि आपले हे डावपेच यश मात्र देत नाहीत. निवडणूक संपताच हे उमेदवार आपल्याला सोडून जातात. कारण ते फक्त निवडणुकीतील फायद्यासाठी आपले नेतृत्व मान्य करतांना दिसतात.

बाळासाहेब, संघ, भाजपच्या विरोधाची आपली जहाल भुमिका कागदावरच राहते प्रत्यक्षात त्याचा भाजपला काही तोटा झाल्याचं दिसत नाही. उलटं भाजपचा फायदा झाल्याचं आकडेवारी सांगते. ( सोबतचा तक्ता पहा )
बाळासाहेब, शरद पवारांबाबत राष्ट्रीय पातळीवर एक संशयाच वातावरण नेहमीच असतं. तशीच परिस्थिती आपल्याबाबत आहे. आपण दिलेला शब्द पाळालच असा विश्वास कोणाला वाटतं नाही. बाळासाहेब हे वेदनादायी चित्र बदलण्याची गरज आहे. शरद पवारांबाबत कोणी काहीही म्हणो, शरद पवारांनी नेमक्या वेळी भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेऊन फुले आंबेडकरी विचाराशी बांधिलकी सिद्ध केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यात या टप्प्यावर सर्वोच्च किमत मोजली आहे. देशभरात एक आदर्श म्हणून नावाजलेलं त्यांचं कुटुंब मोडलं. पण पवारांनी कुटुंबाला महत्व न देता फुले आंबेडकरी विचार महत्वाचा मानला. बाळासाहेब राजकारण असो की वैयक्तिक आयुष्य, किमत तर मोजावीच लागते.
बाळासाहेब, भाजप, संघाच्या विरोधात जोराने बोलून वैचारिकदृष्ट्या या शक्तीच्या विरोधात असलेल्या समजाला, मतदारांना गोलबंद करणे ही आपली कार्यपद्धती आहे अशी टिका होत असते. ही टिका गैरलागू असल्याचं सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे.

बाळासाहेब सध्याचा काळ खुप कठिण आहे. ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीचा उदय, विकास आणि सध्याच्या काळातील त्याच चारित्र, त्याची वाटचाल कोणत्या दिशेनं सुरु आहे हे आपल्याला कोणी सांगण्याची गरज नाही. बाळासाहेब या ब्राह्मणी फॅसिस्ट शक्तीचा पाडाव करण्याची वैचारिक आणि मैदानातील ताकद फक्त फुले आंबेडकरी विचारधारेतच आहे , असा माझा ठाम विश्वास आहे. ( युरोपात या फॅसिस्ट शक्तिचा पाडाव कम्युनिस्ट विचाराच्या जनतेनं केला असेल पण भारतीय फॅसिस्टांच चारित्र्य आणि स्वरुप वेगळं आहे ) हा संघर्ष अंतिम टप्प्यावर आहे , तेव्हा बाळासाहेब या लढ्याचे अग्रदुत व्हा आपण ! महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकशाहीवादी जनता आपल्याकडून हीच अपेक्षा करतेय सध्या.
बाळासाहेब, राजकारण आणि निवडणुकीतील आर्थिक उलाढालीबाबत बोलण्यासारखं काय आहे ? ते एक उघड गुपित आहे. पण आपल्यावर असे आरोप होतात तेव्हा माझ्यासारख्या लोखोंना खुप वाईट वाटतं. आपण असे काही व्यवहार करत असाल यावर माझा विश्वास नाही. बाळासाहेब, आपण ज्या जात वर्गाच प्रतिनिधित्व करता त्या नेत्यावर असे आरोप करणं सोपं असतं. या जात वर्गातील पत्रकार, कार्यकर्ते, अधिकारी कोणावरही असे व्यवहाराचे आरोप करणं हा या व्यवस्थेचा आवडता छंद आहे. त्यांच्यासाठी ते सोयीच असतं. बाळासाहेब काही वेगळ्या कारणांसाठी आपण शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना कधीच जवळ करत नाही.

आपला काँग्रेसवर राग आहे. ( माझ्या वंचिताचे राजकारण या पुस्तिकेत यावर सविस्तर लिहिलं आहे ) खास करुन यशवंतराव चव्हाण , शरद पवार यांच्यावर आपला वैयक्तिक राग आहे. भैयासाहेब आंबेडकर यांना यशवंतराव चव्हाण यानी त्रास दिलेला आहे आणि काँग्रेस / राष्ट्रवादी संपल्याशिवाय नवीन काही उभं राहणार नाही अशी आपली भुमिका आहे. पण बाळासाहेब यांना संपवण्याच्या नादात भाजप किती वरचढ झाला हे समजलचं नाही. बाळासाहेब हेही मला मान्य आहे की पुरोगामी पक्ष आणि कॉग्रेस, राष्ट्रवादीला बळ देणं , निवडून आणणं ही
काही आपली जबाबदारी नाही. आणि प्रस्थापित पक्षाचे नेते भाजपसोबत साटलोट करतात पण आता काळ सोकावला आहे याचं भान आपल्यालाच ठेवावं लागेल.

बाळासाहेब , सध्या आपणच सांगत आहात की मोदीची सत्ता पुन्हा आली तर संविधान आणि देश काहीच शिल्लक राहणार नाही . ( तसं आताही फारसं काही त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाहीच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेद्वारे निर्माण केलेल्या घटनात्मक संस्था मोडित काढलेल्या आहेतच) तर मोदी आणि शक्तीसाठी ही अटीतटीची लढत आहे. लोकशाहीवादयांसाठी निर्णायक निवडणूक असेल. तर मग, बाळासाहेब तुमच्यासाठीही ही शेवटचीच संधी आहे. तेव्हा ही संधी आपण वाया जाऊ देऊ नका. बाळासाहेब तुम्ही फक्त लढण्याचा आदेश द्या. बाळासाहेब , (१) “घटनाकाराचा नातू,” (२) “प्रबोधनकारांचा नातू” आणि राष्ट्र निर्माण कार्यासाठी नेहमी बाबासाहेबांचं सहकार्य घेणाऱ्या व बाबासाहेब आंबेडकरांचा प्रचंड आदर करणाऱ्या (३)”पंडित नेहरू यांचा पणतू” देशात एकत्र फिरले, तर बाळासाहेब सारा देश ढवळून निघेल. “बाळासाहेब या आपल्या ताकदीपुढे कोणी कितीही मोठा असो, ५६ इंचवालाही टिकणार नाही.” तेव्हा बाळासाहेब, ही संधी गेली तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही. आणि इतिहासाला कोण कोणाचा नातू आहे याचं भान नसत.
बाळासाहेब,
जयभीम !!

बंधुराज लोणे ( 9869197934 )