

अमृतमहोत्सवी सहकारी
प्रिय सुधीर पाठक
नागपूर व मुंबई तरूणभारतचे माजी संपादक व माझे प्रिय सहकारी श्री. सुधीर पाठक (Sudhir pathak, Tarun Bharat) यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस आणि तोही पूजनीय सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आज एका भव्य समारंभात साजरा होत आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची व समाधानाची बाब आहे.वाढत्या वयाबरोबर मनुष्य अधिकाधिक प्रगल्भ होत जातो असे म्हणतात पण सुधीरजी मात्र तारूण्यापासूनच प्रगल्भतेची साक्ष देत गेले.अगदी व्यवसायाच्या निवडीपासून तर पत्नीच्या निवडीपर्यंतचा प्रत्येक निर्णय त्यांनी प्रगल्भता हा निकष लावूनच घेतला.त्याचे प्रत्यंतर त्यांच्या गंभीर चेहर्यावरून पदोपदी येत असते.त्यांची पत्नी सौ.नीलिमा उपाख्य विशाखा हिने भगवद्गीता पाठांतरात केलेला विक्रम म्हणजे सुधीरजींच्या योग्य पारखीची जणू साक्षच.
माझे भाग्य असे की, एक्कावन वर्षांच्या पत्रकारितेत मी जेथे जेथे गेलो तेथे तेथे मला सुधीरजींसारखे देवदुर्लभ म्हणावे असे सहकारी लाभले आणि त्यांच्या भक्कम बळावरच पत्रकारिता करू शकलो.सुधीरजी त्यातले मेरूमणी असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
असे म्हणतात की, प्रेम हे करायचे नसते, ते होत असते.केवळ सुधीरजीच नव्हे तर माझ्या प्रत्येक सहकार्याबद्दल तसे म्हणावे लागेल ही त्या भाग्याची खूण.
मी नागपुरात उशीरा आल्याने तत्पूर्वी म्हणजे 1967पूर्वी त्यांच्याशी संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता.नागपुरात आल्यानंतरही त्यांच्याशी संपर्क थोडा उशीराच आला. 1972 मध्ये त्यांनी पत्रकारितेत प्रवेश केला.त्याची सुरूवात झाली मुंबई सकाळपासून. मुंबई सकाळला विशेष बातम्या देऊन त्यांनी मुंबईतील पत्रकारांना जणू आव्हानच दिले होते. त्यानंतर ते नागपूरच्या दैनिक लोकमतमध्ये उपसंपादक म्हणून काम करीत होते.त्यांची पहिली भेट कधी झाली हे आठवत नाही, कारण काय तेही आठवत नाही पण त्यांनी तरूणभारतमध्ये यावे म्हणून मीच पुढाकार घेतल्याचे आठवते.ते त्यांनी मान्य केले आणि नंतर संपर्क वाढत गेला. डिसेंबर 1974 मध्ये त्यानी तभामध्ये प्रवेश केला. संपर्काचे संवादात आणि संवादाचे मैत्रीत केव्हा रूपांतर झाले हे कळलेच नाही.आज तर मी त्यांना माझ्या कुटुंबाचा प्रिय सदस्यच मानतो.हे सगळे अगदी स्वाभाविकपणे व योगायोगाने घडत गेले असे मी समजतो. योगायोगाचा आणखी एक भाग म्हणजे ते उपसंपादक वार्ताहर म्हणून तभामध्ये रूजू झाले व संपादक म्हणून निवृत्त झाले.माझ्याबाबतीतही तसेच घडले.मी मुंबई तरूणभारतमध्ये जसे संपादक म्हणून काम केले तसेच त्यांनीही केले हा तिसरा योगायोग.
नागपुरातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार केशवराव पोतदार नेहमी म्हणत असत की, पत्रकाराला सर्व गोष्टी थोड्याथोड्या करता आल्या पाहिजेत.त्याला अनुसरूनच सुधीरजीनी पत्रकारिता केली.वार्ताहर, प्रमुख वार्ताहर, उपसंपादक, वृत्त संपादक, सहाय्यक संपादक,कार्यकारी संपादक, मुख्य संपादक अशा सर्व भूमिका त्यानी यशस्वीपणे पार पाडल्या.
आपल्याकडे आलेल्या जबाबदारीला त्यानी कधीही नाही म्हटले नाही.तभाचे मुंबईतील विशेष प्रतिनिधी स्व.वसंतराव उपाध्ये निवृत्त झाल्यानंतर ती जबाबदारी कुणाकडे सोपवावी, असा प्रश्न निर्माण झाला. वसंतराव उपाध्ये म्हणजे मुंबईच्या पत्रकारितेतील बाप माणूस.त्यांची जागा घेणे शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते.त्या संदर्भात विचार सुरू झाला तेव्हा पहिले नाव डोळ्यासमोर आले ते सुधीरजींचे आणि त्यानंतर दुसर्या नावाचा विचारच मनात आला नाही.
वार्ताहर म्हणून त्यांचा संचार राजकीय क्षेत्रात तर होताच पण त्याना दुसरे क्षेत्रही वर्ज्य नव्हते.अगदी क्रीडा क्षेत्रापासून तर विधिमंडळाच्या कामकाजाच्या वृत्तसंकलनापर्यंत आणि मोवाड पूरग्रस्तांच्या व्यथांना वाचा फोडण्यापर्यंत त्यांचा संचार होता.भोपाळ येथील युनियन कार्बाइडमधील वायुगळतीचे वृत्त सकाळीच नागपुरात पोचताच त्या दुर्घटनेच्या पाठपुराव्यासाठी रवाना झालेले ते नागपुरातील पहिले पत्रकार होते.त्यांनी व दिवंगत ज्येष्ठ छायाचित्रकार जयंतराव हरकरे यानी अक्षरशः मित्राच्या स्कूटरवर भोपाळभर फिरून ती भीषण दुर्घटना कव्हर केली.कमीतकमी खर्चात झालेले वृत्तसंकलन म्हणून त्याची तभाच्या इतिहासात नोंद झाली.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मुक्तीच्या विषयाकडे भारतीय पत्रकारितेचे लक्ष वेधण्याचे ऐतिहासिक कार्य करण्याचे श्रेय जसे दिवंगत ज्येष्ठ पत्रकार स्व.राजाभाऊ पोफळी यांच्याकडे जाते तसेच त्या विषयाचा कारसेवक बनून पाठपुरावा करण्याचे श्रेय सुधीरजींकडे जाते.
माध्यमांच्या क्षेत्रातील वृत्त संकलन करणारे वार्ताहर त्यात इतके रममाण होऊन जातात की, त्याना उपसंपादकाचे काम करणे आवडत नाही.स्तंभलेखनाकडे वळणे त्याना कठिण जाते.पण सुधीरजीनी ती उणीव आपल्यात निर्माणच होऊ दिली नाही. त्यांनी
चालविलेल्या अबीर गुलाल, पिंपळपार या स्तंभानी तर वाचकप्रियतेचा जणू उच्चांकच गाठला.सामान्य माणसाच्या मनातील हळुवार भावनांचा धांडोळा हे त्या स्तंभलेखनाचे वैशिष्ट्य ठरले.त्या स्तंभाना त्यानी राजकारणाची घाण चिकटू दिली नाही.
सर्वच पत्रकाराना लिहावे लागते.पण त्यातील सर्वाना साहित्यिक म्हणता येत नाही. पण सुधीरजींचे साहित्य क्षेत्रातही योगदान आहे. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत व संपादितही केली आहेत.त्यात स्व.भय्यासाहेब मुंडले, बॅ.शेषराव वानखेडे, दिवंगत आमदार भाऊसाहेब फुंडकर यांच्या जीवनावरील पुस्तके उल्लेखनीय आहेत.स्व.रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या ‘ अजातशत्रू’ या ग्रंथाच्या संपादनातही त्यानी महत्वपूर्ण भूमिका बजावली. पत्रकारितेच्या क्षेत्रात चौफेर संचार करणार्या माझ्या या प्रिय सहकार्याचा आज पूजनीय सरसंघचालकांच्या हस्ते गौरव होत आहे हा माझ्यासाठी किती आनंदाचा व समाधानाचा विषय असेल ही कल्पनाच दिव्य अनुभूती ठरते.सुधीरजींना अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर