खिचडी घोटाळ्यात अमोल कीर्तिकरांची चौकशी होणार

0

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आणखी एक नेता घोटाळ्याच्या आरोपांमध्ये अडकला आहे. मुंबई महापालिकेतील (Khichadi Scam in BMC) कथित खिचडी घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे दाखल केल्यावर आता ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर अडचणीत येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या घोटाळ्यात अमोल किर्तीकर यांचेही नाव समोर आले आहे. अमोल किर्तीकर हे उद्धव ठाकरे यांच्या गटातून उत्तर पश्चिम लोकसभेसाठी उमेदवार असू शकतात. महापालिकेत करोना काळात 160 कोटींचा खिचडी गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. खिचडी घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांची यांची २२ ऑगस्ट रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
काय आहे घोटाळा
कोरोना काळात काही नेत्यांनी स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट मुंबई महापालिकेकडून मिळवले. लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. यात 160 कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी महापालिकेकडून ८.१० कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे. त्यातील 4 कोटी बोगस कंपन्यांना वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.