High Court : वायकरांच्या खासदारकीला उच्च न्यायालयात आव्हान!

0

मुंबई (Mumbai), १७ जुलै : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Balasaheb Thackeray)पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल  (High Court)केली. या याचिकेद्वारे शिंदे गटाचे रवींद्र वायकर (Ravindra Vaykar )यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे. वायकर यांचा विजय अवैध ठरवून कीर्तिकर यांना विजयी घोषित करावे, अशी विनंती याचिकेतून केली आहे.

कीर्तिकर यांनी याचिकेत मतमोजणीतील अनियमितता आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम मतांच्या मोजणीनंतर कीर्तिकर एका मताने विजयी झाल्याचे जाहीर केले होते, परंतु नंतर ३३३ टेंडर मतांमध्ये घोळ घातल्याचा आरोप आहे. ‘फॉर्म-१७सी’नुसार ३३३ टेंडर मतांची नोंद झाली होती, मात्र फॉर्म-२० नुसार फक्त २१३ मतांची नोंद करण्यात आली. या मतांच्या घोळामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत दावा केला आहे की निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीवेळी नियमावलीचे उल्लंघन केले. कीर्तिकर यांच्या पोलिंग एजंट्सना एआरओ व आरओ टेबलजवळ बसू दिले नाही. जोगेश्वरी, वर्सोवा, आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक पोलिंग बूथचे फॉर्म-१७ सी दिले नाहीत. मतांच्या फेरमोजणीची विनंतीही फेटाळली गेली. मतमोजणी केंद्रात बेकायदेशीर मोबाईल वापर आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये अधिकाऱ्यांचे अनुचित वर्तन दिसल्याचेही याचिकेत नमूद आहे.मतमोजणीच्या २६ राऊंड्सनंतर कीर्तिकर यांना ६५० अधिक मते मिळाली होती, परंतु अधिकाऱ्यांनी १ मताने विजयी झाल्याचे जाहीर केले. कीर्तिकर यांनी तातडीने आक्षेप घेतला आणि फेरमतमोजणीची मागणी केली, जी फेटाळली गेली. याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमावलीची थट्टा केल्याचा आरोप आहे.न्यायालयाने याचिकेच्या सुनावणीवेळी मतमोजणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे, त्यामुळे वायकर यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.