

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मागणीला यश
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गांधी चौक परिसरातील वादग्रस्त अम्मा चौक स्मारक अखेर हटविण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
गांधी चौक ते महानगर पालिकेच्या नेताजी भवन च्या मागील भागात महादेव मंदिर आहे. ते भारत सरकारद्वारे ११ एप्रिल १९२५ रोजी केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्राचीन स्मारके व पुरातत्त्व स्थळे अधिनियम १९५८ नुसार या परिसरातील १०० मीटरच्या आत कोणतेही नवीन बांधकाम किंवा अतिक्रमण करण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून परवानगी न घेता पोलिस ठाणे आणि नेताजी भवनच्या मधोमध अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.
या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर पुरातत्त्व विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसे न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. अखेर प्रशासनाने अतिक्रमण हटवून परिसर मुक्त केला.
या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस कमिटीने सांगितले की, गांधी चौक परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. नियम मोडून उभारलेले स्मारक हा कायद्याचा अवमान होता. भविष्यात असा प्रकार घडू नये, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.