

अमित शाह आज नाशिक आणि कोल्हापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच अमित शाह यांनी विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना येत्या विधानसभेची रणनिती सांगितली आहे.
Amit Shah In Maharashtra : आगामी विधानसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांच्याही अंतर्गत बैठका सातत्याने होत आहेत. या बैठकीत जागावाटप, मतदारसंघ आणि मुख्यमंत्रिपद यावर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह आज नाशिक आणि कोल्हापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच अमित शाह यांनी विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना येत्या विधानसभेची रणनिती सांगितली आहे.
मत वाढवण्यासाठी खास प्लॅन
अमित शाह यांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना आगामी विधानसभेची रणनिती कशी असेल, यासाठी पदाधिकाऱ्यांना काय करावे लागेल, याची रणनिती सांगितली. एका बूथवर 10 टक्के मत वाढवा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घ्या. प्रत्येक मंडळाच्या एका कार्यकर्ता शक्ती केंद्र द्यायचं आहे. यानंतर मंडळ अध्यक्ष प्रमुख यांना बूथ अध्यक्षाने 10 टक्के मत वाढवण्यासाठी फॉलोअप घ्या. दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सगळ्या बूथवर एक राऊंड मारायचा. भारत माता की जय म्हणत रॅली काढायची आहे. त्यानंतर ज्या मंदिरात पुजारी असतील, त्याच्या पाया पडायचं. श्रीफळ देऊन १०१ रुपया द्यायचा आहे आणि त्यांचा निवडणुकीसाठी आशीर्वाद घ्यायचा, असा प्लॅन अमित शाहांनी सांगितला.
महाविकासाआघाडीतील पक्षांची चिंता करायची नाही. मत वाढवण्यासाठी प्रत्येक घरात जायचं. पदाधिकारी कार्यकर्त्यांचे भांडण मिटवा. आजपासून निवडणुका चालू झाल्या आहेत असं समजा. प्रत्येक बूथवरील महाविकासाआघाडीच्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या, विजय तुमचाच होईल. हे सगळं केलं तर मराठवाड्यात ३० जागा नक्की येतील, असा विश्वासही अमित शाहांनी व्यक्त केला.
नाशिकसह खान्देशाचाही आढावा घेणार
तसेच अमित शाह यांनी आज नाशिकमध्ये एका बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी ते जळगाव जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. अमित शहा जळगाव जिल्ह्याचाही स्वतंत्र आढावा घेणार असून, यासाठी जिल्ह्यातील सर्व भाजपचे आमदार व प्रमुख पदाधिकारी हजर राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात अमित शाह यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राचा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
यात खान्देशातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांचा समावेश असलेले क्लस्टर मिळून तसेच नाशिक व अहमदनगर क्लस्टर मिळून संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा आढावा अमित शाह घेणार आहेत. या बैठकीला जळगाव जिल्ह्यातील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष, तसेच मंडळ अध्यक्ष हजर राहणार आहेत.
कोल्हापुरात महत्त्वाची बैठक
तर दुसरीकडे अमित शहा हे कोल्हापुरातही आज भेट देणार आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जाणार आहे. कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी चार वाजता ही बैठक पार पडणार आहे. यासाठी महासैनिक दरबार हॉल परिसरात बैठकीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच पदाधिकाऱ्यांकडून अमित शाह यांच्या स्वागताचे फलकही लावण्यात आले आहेत. या बैठकीआधी अमित शहा अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत.