

मुंबई (Mumbai), १० नोव्हेंबर : राहुल गांधींनी वीर सावरकरांसाठी दोन चांगले शब्द बोलून दाखवावे. वीर सावरकरांचे नाव कोणत्याही काँग्रेस नेत्याने घेतले का? बाळासाहेब ठाकरे यांचे गुणगान कोणी काॅंग्रेस नेता करू शकतो का? उद्धवजी तुम्ही कोणासोबत बसला आहात, जी लोक कलम ३७० ला विरोध करत आहे, जी लोक राम मंदिरास विरोध करतात, जी लोक सावकरांसंदर्भात चांगले बोलू शकत नाही? संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत तुम्ही बसला आहात. सीएए, युसीसीला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहोत. वक्फ बिलाच्या सुधारणेला विरोध करणाऱ्यांसोबत बसला आहात. तुम्हाला कुठे बसायचं हे तुम्हीच ठरवा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Union Home Minister, senior BJP leader Amit Shah)दिला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत संकल्प पत्र प्रकाशित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा कौल द्यावा. तुम्ही आम्हाला पहिल्यांदा जनादेश दिला. नंतर २०१९मध्ये आम्हाला कौल दिला. पण काही लोकांनी सत्तेसाठी धोका दिला. पण ते जास्त काळ टिकू शकले नाही. आम्ही मोदींच्या नेतृत्वात लढत आहोत. आघाडीत अंतर्गत मतभेद आहेत. मी उद्धव ठाकरे यांना विचारतोय की, सावरकरांबद्दल राहुल गांधीना दोन शब्द चांगले बोलायला सांगाल का. काँग्रेसच्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल दोन शब्द बोलायला सांगाल का. मी उद्धव ठाकरेंना विनंती करतो हे जरा विचाराच…, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
महाराष्ट्र अनेक युगापासून देशाचे नेतृत्व करत आहे. भक्ती आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. जेव्हा गरज पडली तेव्हा गुलामीतून मुक्तीचे आंदोलन शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली. सामाजिक क्रांतीची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली. महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिबिंब, आज महायुतीने शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची, महिलांचा स्वाभिमान वाढवण्याची आणि वारसा पुनरुज्जीवित करण्याची शपथ घेतली आहे. महायुती सरकारने महिला, शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. मजबूत, समृद्ध आणि सुस्कृंत महाराष्ट्रासाठी संकल्प पत्र आहे. ज्या संकल्प पत्राचं लोकार्पण झाले ते महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षेचं प्रतिबिंब आहे.
शरद पवार ज्या पद्धतीने आश्वासन देतात, ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करतात, त्याचा वास्तवाशी किलोमीटरपर्यंतही संबंध नसतो. खोटे आरोप करून नरेटिव्ह तयार करतात. नकली जनादेश घेण्याचं काम करतात. यावेळी ते होणार नाही. यावेळी महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे. शरद पवारांना विचारतो दहा वर्षे तुम्ही केंद्रात मंत्री होता. २००४ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं ते सांगा. तुमच्या सरकारमध्ये दहा वर्षात महाराष्ट्रावर किती अन्याय झाला ते सांगा.
आज मी आंबेडकरांच्या भूमीवर उभा आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरच्या भूमीवर भारतीय राज्यघटनेनुसार शपथ घेतली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. याचा देशाला अभिमान आहे. मी महाराष्ट्रातील जनतेला महायुती सरकारला सलग तिसऱ्यांदा जनादेश द्यावा, अशी विनंती करतो. मी म्हणतो की, काँग्रेसने आश्वासने दिली तर ती विचारपूर्वक केली पाहिजेत, कारण ते आश्वासने पूर्ण करत नाहीत आणि मला उत्तर द्यावे लागेल. तेलंगणा, हिमाचल ही त्याची उदाहरणे आहेत. त्यांच्या आश्वासनांची विश्वासार्हता नरकात गेली आहे.