
मदत करायची नव्हती तर घोषणा केली कशाला ; मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- (morshi) शासनाने जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले असतानाही, मोर्शी वरूड तालुक्यातील ८५ हजार शेतकऱ्यांना मदतीचा एक रुपयाही न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांची दिवाळी ‘काळी’ झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केला आहे.
रुपेश वाळके यांनी याबद्दल आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांना संतप्त सवाल केला आहे: “आमची दिवाळीच जर काळी करायची होती, तर घोषणा केली कशाला? आमची गोड फसवणूक का केली? आम्हाला का फसवले?” असा सवाल उपस्थित केला आहे.
जुलै ते सप्टेंबर महिन्यात मोर्शी वरूड तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे ५० हजार हेक्टर क्षेत्रावरील संत्रा पिकाचे कधीही भरून न निघणारे कोट्यावधी रुपयांचे संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी मोर्शी तालुक्यातील निंभी येथील एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपविली असून अजून किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर मोर्शी वरूड तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत मंजूर कराल असा संतप्त सवाल मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकरी व्यक्त करतांना दिसत आहे.
सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठे मदत पॅकेज जाहीर केले आणि हे पैसे दिवाळीपूर्वी खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दिवाळी तोंडावर आली तरी, मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपयाची मदत जमा झाली नाही. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.