

चंद्रपूर (CHANDRAPUR)– माणूस कितीही मोठा झाला, तरी तो आपल्या मूळाशी जोडलेला राहावा, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमदार श्री. सुधाकर अडबाले. आपल्या व्यस्त राजकीय वेळापत्रकातून वेळ काढत त्यांनी आज आपल्या जन्मगावी – मारडा (ता. चंद्रपूर) – भेट देत शेतात स्वतः वखरणी करत शेतीचा आनंद अनुभवला. या दृश्यातून त्यांच्या मातीशी असलेल्या नाळीचा प्रत्यय जनतेला पुन्हा एकदा आला.
शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नसून ती संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेले नातेही आहे. सुधाकर अडबाले हे केवळ शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नसून स्वतः शेतकरी पुत्र असून त्यांना शेतीची ओढ मनापासून आहे. आज मारडा येथील त्यांच्या शेतात त्यांनी बैलजोडीच्या साहाय्याने वखरणी करत पारंपरिक पद्धतीने शेतीची कामे केली. स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनीही त्यांच्या या सहजतेने केलेल्या सहभागाचे कौतुक केले.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा
सुधाकर अडबाले हे शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ बोलून व्यक्त करत नाहीत, तर विधिमंडळात ठामपणे मांडत असतात. मग ते पांदण रस्त्यांच्या सुविधा असोत, हमीभावाचा प्रश्न असो, अथवा शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा मुद्दा, प्रत्येक गोष्टीसाठी ते सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत केवळ आश्वासन नाही, तर कृती दिसते, म्हणूनच त्यांना ‘शेतकऱ्यांचा खरा प्रतिनिधी’ म्हणून ओळख मिळाली आहे.
मारडा गावात आज झालेल्या त्यांच्या या शेतभेटीतून केवळ शेतीचा आनंदच नव्हे, तर स्वतःच्या माणसांशी असलेले नातं, गावाशी असलेली आपुलकी आणि माणुसकीची जपणूक स्पष्टपणे दिसून आली. गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, काहींना तातडीने मदतीचाही शब्द दिला.
शेती म्हणजे संकटांचे दुसरे नाव, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही आमदार अडबाले हे प्रत्यक्ष शेतात उतरून शेती कामात रमले, ही बाब अनेक नव्या पिढीतील लोकांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. त्यांनी दिलेल्या या उदाहरणातून नेतेपद म्हणजे केवळ खुर्ची नसून लोकांमध्ये मिसळणे, त्यांच्यासोबत राहणे आणि त्यांची दुःखे समजून घेणे हेच खरे नेतृत्व असल्याचे अधोरेखित झाले.