

मुंबई(Mumbai)
अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचे हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये प्रीमियर शो चे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन उपस्थित राहणार होता. ठरल्याप्रमाणे अल्लू अर्जुन त्याठिकाणी दाखल झाला. मात्र, यावेळी त्याला पाहण्यासाठी हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर प्रचंड गर्दी जमली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेला मृत्यू झाला. तर, तिचा मुलगा या घटनेत गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेवर अल्लू अर्जुनने दुःख व्यक्त केले आहे. अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपले दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृत महिला आणि जखमींना मदत करणार असल्याचेही त्याने व्हिडीओत म्हटले आहे.
या कठीण प्रसंगी मी महिलेच्या कुटुंबियांसोबत असून मी स्वतः जावून त्यांची भेट घेईल. मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची भरपाई देणार आहे. तसेच उपचार आणि औषधांचा सर्व खर्चही आम्ही करू. त्यांच्यासाठी मला जे काही करता येईल ते सर्वकाही मी करेल. हे नुकसान कधीच भरून काढता येणार नाही. आम्ही तुमच्या दुःखात सामिल आहोत, असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.