आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द

0

पहलगाम हल्ल्यानंतर तयारीचे निर्देश

सहा महिन्यांच्या शस्त्रसाठ्याचे उद्दिष्ट

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले आहे. युद्धजन्य स्थिती उद्भवल्यास आयुधांची कमतरता भासू नये म्हणून सर्व आयुध निर्माणी केंद्रांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशातील सर्व आयुध निर्माणी संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत.

विदर्भातील भद्रावती (चंद्रपूर), जवाहर नगर (भंडारा), वाडी (नागपूर) येथील आयुध निर्माणींना यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मंजूर झालेल्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या असून संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भद्रावती आयुध निर्माणीमध्ये ‘पिनाका’ मिसाईल, 155 बोफोर्स सेल, 81 मिमी मोर्टार आणि विविध ग्रेनेड्सची निर्मिती केली जाते. येत्या सहा महिन्यांकरिता आवश्यक शस्त्रसाठा तयार करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले असून त्यानुसार काम सुरू झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे सर्व स्तरांवर युद्धपातळीवर उत्पादन सुरू असून, कर्मचाऱ्यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.