

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मंचावर नागेश शिंगणे, डॉ. रामदास आंबटकर व जयंत पाठक
नागपूर (Nagpur) 1 sep 2024 :- लोकशाही यशस्वी होण्याची सुरवात ग्रामपंचायती पासून होते असे सांगून एकूणच आपल्या यंत्रणांची कामगिरी सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सल्लागाराची भूमिका योग्य बजावावी असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘स्थानिक स्वराज्य संस्था दिवस’, तसेच नागपूर केंद्राचा रौप्य महोत्सवी सोहळा आज राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, राजनगर येथे आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. रामदास आंबटकर, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक नागेश शिंगणे आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
सांडपाणी, घनकचरा, पिण्याचे पाणी, रस्ते, पुराच्या पाण्याचा निचरा, नाले सफाई या बद्दल लोकांना अनेक समस्या येतात. त्यासाठी त्यांना स्थानिक ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिकेचे खेटे घालावे लागतात. अश्या परिस्थितीत जर स्थानिक स्वराज्य संस्थांनी जागतिक दर्जाची तज्ञ मंडळी, नवनवीन तंत्रज्ञान, यांचा योग्य उपयोग करून शाश्वत, परवडणारे, सोपे मॉडेल सार्वजनिक-खाजगी भागीदारी आधारावर तयार केले, त्या बद्दल योग्य सल्लागारची भूमिका बजावली तर लोकांचा त्रास कमी होईल अश्या सूचना त्यांनी केल्या. याशिवाय नागपूर केंद्राच्या रौप्य महोत्सवी वर्षाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन जयंत पाठक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुरवातीला केंद्रीय (Nitin Gadkari) मंत्र्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ च्या माध्यामाने अग्निशमन महाविद्यालायाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर संस्थेचा इतिहास, कार्य, कामगरी यांचा मागोवा घेणाऱ्या .वे टु गुड गवरनन्स’ या ‘कॉफीटेबल बुक चे प्रकाशन करण्यात आले.
स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम आणि लोकल सेल्फ गव्हर्मेंट डिप्लोमा या अभ्यासक्रमातील प्रथम विद्यार्थ्यांना स्वर्गीय मोहन जावडेकर, स्वर्गीय श्रीपाद मुजुमदार, स्वर्गीय रितेश हेरॉल्ड, स्वर्गीय मधुसूदन टाकसाळे, स्वर्गीय हरिदास वायगोकर यांच्या स्मृतीमध्ये पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व यशश्री भावे यांच्या समूहातर्फे संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचा इतिहास आणि उपक्रमांची माहिती तसेच अतिथींची ओळख आणि आभार प्रदर्शन जयंत पाठक यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मोहगावकर यांनी केले.