‘त्या’ तीन खात्यांवर अजित पवार गट अडला, तिढा दिल्लीत सुटणार

0

 

मुंबई- राज्याच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यावर आता खातेवाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. अजित पवार यांचा गट महसूल, अर्थ आणि जलसंपदा या तीन खात्यांसाठी अडून बसला आहे. महसूल खाते हे सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे. तर अर्थ आणि जलसंपदा ही दोन्ही खाती सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. मात्र, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आता हा तिढा नवी दिल्लीत भाजपचे केंद्रीय नेतृत्वच सोडविणार असल्याचे बोलले जात असून नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.
अजित पवारांच्या प्रवेशापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम मंत्रिमंडळ विस्तार करा आणि नंतर योग्यवेळी खातेवाटप करु, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपाची चर्चा सुरु झाली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये मुख्ममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन मॅरेथॉन बैठका झाल्या आहेत. वर्षा बंगल्यावर रात्रीच्यावेळी हे तिन्ही नेते बराच काळ राजकीय खलबतं करत होते. मात्र, खातेवाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. अजित पवारांना अर्थखाते द्यायला आमदारांचा तीव्र विरोध आहे. अजित पवार हे भेदभाव करतात, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आता यावर काय तोडगा निघणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आता हा विषय आपल्या हाती घेतल्याची माहिती असून लवकरच या नेत्यांना दिल्लीला जावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.