अजित पवारांकडून पक्ष संघटनेतील पदाची मागणी

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिनाच्या सोहळ्यात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेतेपदामध्ये रस नसल्याचे स्पष्टच सांगितले. आपल्याला पक्ष संघटनेत कोणतेही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईल, असेही पवार (Senior NCP Leader Ajit Pawar) यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद मिळविण्याचे अजित पवार यांचे प्रयत्न आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे आहे. मागील पाच वर्षांपासून प्रदेशाध्यक्षपदावर ते कार्यरत असून प्रत्येकी 3 वर्षांनंतर पद बदलण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या मागणीची पक्ष काय दखल घेतो, याकडे आता लक्ष लागलेले आहे. अलिकडेच शरद पवार यांनी त्यांचे पक्षातील उत्तराधिकारी म्हणून प्रफुल्ल पटेल व खासदार सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्त्या झाल्यानंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आज अजित पवारांनी पक्ष संघटनेतील पद देण्याची विनंती करून एकप्रकारे आपल्या मनातील खंत बोलून दाखवल्याचे बोलले जात आहे.