
नागपूर: विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली. त्यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण होते. शेवटच्या दिवशी केवळ तीन प्रस्ताव मांडल्यामुळे जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.
ते म्हणाले की, सभागृह संपले नाही. एक तर दहा दिवसांचे अधिवेशन केले आणि तिकडून दोन प्रस्ताव आणि इकडून एक प्रस्ताव असे हे बरोबर नाही. त्यासाठी आम्ही म्हणत होतो की एक महिन्याचे अधिवेशन घ्या आणि चर्चा करा. जयंत पाटील यांचे भाषण सुरु असताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुजबुज सुरु होती. त्यावर तुमच्यात आधी ठरवा की कोण आधी बोलायचे ते, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. त्यामुळे अजित पवार चांगलेच भडकले. अजित पवार म्हणाले, आमच्याच अंडरस्टँडिंग असून कोणी बोलायचे ते आम्हाला माहिती आहे. सभागृहात एक आणि बाहेर एक अशी भूमिका मांडण्याचा धंदा बंद करा, असा सल्लाही त्यांनी जयंत पाटलांना दिला. दरम्यान, त्यावर बोलताना फडणवीस यांनीही जयंत पाटील यांना चिमटा काढला. फडणवीस म्हणाले, मी आपल्या निदर्शनास आणून देतो की, आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता. तुम्ही तसा दिला नाही. म्हातारी मेल्याचं दुः ख आहे पण काळ सोकावतोय. विरोधी पक्षाला विदर्भातच येऊन विदर्भाचा विसर पडला हे बरोबर नाही, असेही ते म्हणाले.