
मुंबई- राष्ट्रवादी कोणाची, यासाठी मुंबईत अजित पवार आणि शरद पवार गटांचे शक्तीप्रदर्शन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 54 आमदार आहेत. त्यातील दोन तृतीयांश आमदाराचा पाठिंबा असेल, तरच अजित पवार यांचे बंड यशस्वी ठरेल, असे मानले जात आहे. सध्यातरी अजित पवारांच्या बैठकीत सुमारे ३२ आणि शरद पवारांच्या बैठकीत १८ आमदार दाखल झाल्याची माहिती असून मॅजिक फिगर गाठण्यासाठी अजित पवारांना यश येईल का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. हा फिगर गाठता न आल्यास बंडखोरांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते, अशी माहिती जाणकारांनी दिली.
अजित पवार यांच्या गटाचे मुंबईत शक्तीप्रदर्शन सुरू आहे. वांद्रे येथील एमईटी कॉलेजच्या मैदानावर त्यांचा मेळावा सुरू आहे. तर शरद पवार गटाची बैठक वायबी चव्हाण सेंटरला सुरु आहे. साऱ्यांच्या नजरा आता आमदारांच्या संख्येकडे लागलेल्या आहेत. अजित पवार यांच्या बैठकीत ३२ आमदार पोहोचल्याची माहिती असून शरद पवारांच्या बैठकीत १८ आमदारांनी उपस्थिती लावल्याची माहिती आहे. उर्वरित ४ आमदारांचा कल कोणाकडे असणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अजित पवारांना बंड यशस्वी करण्यासाठी ही संख्या पुरेशी नाही, हे देखील स्पष्ट असून आगामी घडामोडींकडे लक्ष लागलेले आहे.