
बंगळुरु-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी वायुसेनेच्या तेजस या लढाऊ विमानातून उड्डाण केले. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी बंगळुरुमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कंपनीला भेट देऊन तेथे चालणाऱ्या कार्याची माहिती घेतली. त्याचवेळी त्यांनी लढाऊ विमान तेजसच्या हवाई उड्डाणाचा आनंद घेतला. बंगळुरुच्या येलाहंका एअरबेसवरुन हे उड्डाण करण्यात आले.
तेजस हे हलके लढाऊ विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने विकसित केले आहे. या विमानांची दोन स्क्वाड्रन सध्या वायुसेनेत तैनात आहे. यापूर्वी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस तसेच संरक्षण मंत्री असताना निर्मला सीतारामन या नेत्यांनी सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून उड्डाण केले होते. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, खासदार राजीव प्रसाद रूडी, संरक्षण राज्य मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी देखील ही कामगिरी केली होती.