शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे कृषी प्रदर्शन ऍग्रोव्हिजन 24 ते 27 नोव्हेंबर

0

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे कृषी प्रदर्शन ऍग्रोव्हिजन 24 ते 27 नोव्हेंबर नागपूर -विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची, जोडधंद्यांची माहिती व्हावी, शेती लाभदायक व्हावी या हेतूने, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन येत्या २४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अमरावती मार्गावरील दाभास्थित पीडीकेव्ही, दाभा मैदानावर होत असलेल्या या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची माहिती अ‍ॅग्रोव्हिजन आयोजन सचिव रवी बोरटकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

२४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन अ‍ॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी केंद्रीय दुग्ध, मत्स्य व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसुल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. मीनेश शहा प्रामुख्याने उपस्थित राहतील. विविध नामांकित ४५० कंपन्यांचे स्टॉल राहणारे असल्याचे बोरटकर यांनी सांगितले.
सुधीर दिवे यांनी सांगितले की, यंदा मदर डेअरी, उस, बांबू, संत्रा अशा विविध महत्त्वपूर्ण विषयावर लहान-मोठ्या ३१ कार्यशाळा आयोजित आहे. विशेष म्हणजे, यंदा महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचेही जवळपास ६० स्टॉल्स या प्रदर्शनीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. मायी यांनी सांगितले की, यंदा आयोजित सर्व कार्यशाळांमध्ये तज्ज्ञ मंडळींसोबतच प्रगतीशिल शेतकरीही उपस्थितांना मागदर्शनासोबतच आपले अनुभव कथन करतील.समारोपीय कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्यप्रताप शाही, अरुणाचल प्रदेशचे कृषी मंत्री टागे टाकी, आसामचे कृषी मंत्री अतुल बोरा, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित राहतील. पत्रपरिषदेला अ‍ॅग्रोव्हिजनचे अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, आयोजन सचिव रवी बोरटकर, सचिव रमेश मानकर, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, सुनील सहातपुरे, प्रा. कवले, कॅप्टन कलंत्री, आनंदराव कदम, देवेंद्र पारेख, शिरीष भगत आदी उपस्थित होते.

मदर डेअरीच्या 500 कोटींच्या प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन, संत्रा, ऊस उत्पादनावर कार्यशाळा
यंदा अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये उदघाटन समारंभानंतर लगेच बुटीबोरी येथे प्रस्तावित मदर डेअरीच्या 500 कोटी रुपयांच्या दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योगाचे भूमीपूजन होणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योग: संधी व आव्हाने या विषयांवर २ दिवसाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या एलआयटी अल्युमिनी असोसिएशनच्या सहयोगाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या शिवाय यंदा अ‍ॅग्रोव्हिजनमध्ये काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात विदर्भात डेअरीचा विकास २४ नोव्हेंबर रोजी, ऊस उत्पादन तंत्रज्ञान कार्यशाळा २५ नोव्हेंबर रोजी, संत्रा लागवड व निर्यात संधी २६ नोव्हेंबरला, एफपीओ फॉर्मेशन मार्गदर्शन कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता, महिला बचतगट मेळावा २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता, विदर्भात गोड्यापाण्यातील मत्सव्यवसायाच्या संधी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय चार दिवसांमध्ये विविध ३१ विषयांवर कार्यशाळा आयोजित आहे. या कार्यशाळा परिषदेला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मत्स्यव्यवसाय व वने मंत्री यांचीही उपस्थिती राहणार आहे.