Agriculture Minister Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार, न्यायालयाचा मोठा निर्णय

0

Agriculture Minister Manikrao Kokate :माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयाकडून ही स्थगिती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोप त्यांच्यावर होता. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आता नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा दिला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी याबद्दलचा निकाल दिला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी याबद्दल घेतलेला आक्षेपही फेटाळण्यात आला आहे. पण माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार अद्यापही कायम आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 1995 ते 97 काळात सरकारच्या 10 टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. या आरोपांनुसार भादवी 420, 465, 471,47 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या सुनावणीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली होती.

आता या शिक्षेला स्थगिती मिळावाळी यासाठी माणिकराव कोकाटेंनी वरच्या कोर्टात धाव घेतली होती. आता अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. यावेळी कोर्टात माजी मंत्री तुकाराम दिघोळे हे साक्षीदार आणि तक्रारदार नव्हते. त्यामुळे जावई आशुतोष राठोड यांना न्यायालयाने फटकारले आहे. आता उद्या याप्रकरणी सरकारी पक्षाचे वकील बाजू मांडणार आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. सुनावणी संपेपर्यंत कोकाटे यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटे विधिमंडळात अपात्र होऊ नये, यासाठी देखील त्यांनी वेगळी याचिका दाखल केली होती. कोकाटे अपात्र ठरू नये, यावर उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी संपेपर्यंत कोकाटे यांना १ लाख रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता आमदारकी रद्दबाबत सुनावणी संपेपर्यंत न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.