ब्रह्मोस मिसाइल हेरगिरी प्रकरणी अग्रवालला जन्मठेप

0

या जिल्हात न्यायालयाने ठोठावली शिक्षा

 

नागपूर(Nagpur):– 03 जून  ब्रह्मोस मिसाईल तंत्रज्ञानाची पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा वैज्ञानिक निशांत अग्रवाल(Nishant Aggarwal) याला आज, सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये अडकून हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवाल याला नागपुरातील उज्ज्वलनगर परिसरातून 2018 मध्ये अटक केली होती.

आरोपी वैज्ञानिक निशांत अग्रवाल हा उत्तराखंडच्या रुडकी येथील रहिवासी होता. त्याने कुरुक्षेत्रच्या एनआयटीतून(from NIT)अभियंत्रिकीचे शिक्षण घेतले होते. अभ्यासात हुशार असलेल्या निशांतला 2014 मध्ये नागपुरातील ब्रह्मोस मिसाइल युनिटमध्ये नोकरी लागली होती. ब्रह्मोस हे रशिया आणि भारत यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले अतिशय जोरदार क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस मिसाईल युनिटच्या हायड्रॉलिक-न्यूमेटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विभागाच्या 40 लोकांच्या चमूचे नेतृत्व निशांत अग्रवालकडे होते. त्याच्या युनिटने 2017-18 मध्ये निशांतचा युवा वैज्ञानिक पुरस्कारानेही गौरव केला होता. ब्रह्मोसच्या सीएसआर(CSR), आरअँडडी ग्रुपचाही सदस्य होता. तसेच अटक झाली त्यावेळी निशांत अग्रवाल ब्रह्मोस नागपूर व पिलानी साइट्सचे प्रोजेक्ट्स पाहत होता. याकाळात नागपूर विमानतळानजीक असलेल्या उज्ज्वलनगर या उच्चभ्रू वस्तीत निशांतचे वास्तव्य होते. याठिकाणी मनोहर काळे यांच्याकडे तो भाड्याने राहत होता.

यादरम्यान निशांत पाकिस्तानच्या हनीट्रॅपमध्ये सापडला. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर तो पाकिस्तान आणि अमेरिकेसाठी हेरगिरी करू लागला. उत्तरप्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) 2018 च्या सुरुवातीला एका आयएसआय एजंटाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून निशांत अग्रवालचे नाव समोर आले. मिलिटरी इंटेलिजन्सला याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर यूपी एटीएस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकांनी त्याची माहिती जमवणे सुरू केले. निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसोबत डीआरडीओ आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राची माहिती शेअर करीत होता. तर आयएसआयकडून ही माहिती अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेला पोहोचवली जात होती.

निशांतची कुंडली हाती आल्यानंतर उत्तरप्रदेश एटीएस, नागपूर पोलिसांनी संयुक्तपणे निशांतच्या नागपुरातील घरी धाड टाकली. त्याचवेळी त्याच्या रुडकी येथील घरी देखील धाड टाकण्यात आली. यावेळी निशांतकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी निगडित माहिती व दस्तऐवज मिळाले होते. संयुक्त पथकांनी निशांतच्या रुडकी येथील घर, ब्रह्मोसचे नागपूर यूनिट आणि नागपुरातील घरी झडती घेतली होती. यात गॅझेट सोबतच काही कागदपत्रे आणि बँक स्टेटमेंन्टस देखील हाती लागले होते. त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून असे स्पष्ट झाले की, पूजा रंजक आणि नेहा शर्मा नावाने दोन संशयास्पद फेसबुक अकाऊंटस निशांतच्या फ्रेंडलिस्टमध्ये होती. ही दोन्ही अकाऊंटस पाकिस्तानातून आयएसआय ऑपरेट करीत होती. त्यानंतर निशांतला अटक करण्यात आली. याप्रकरणी नागपूर जिल्हा न्यायाधीश क्र.-1 श्रीमती देशपांडे यांच्या कोर्टात हा खटला सुरू होता. विशेष सरकारी वकील ज्योती वजानी यांनी पुराव्यांसह केलेला आरोप आणि युक्तीवाद ग्राह्य धरून कोर्टाने सोमवारी 3 जून 2024 रोजी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.