

फडणवीस दिल्लीत दाखल; मोदी शहाची भेट घेणार
नागपूर (शंखनाद ब्यूरो रिपोर्ट) : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपला पाहिजे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे राज्यातील नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा देतो, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली. दरम्यान फडणवीस नागपूरला दाखल झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला असून स्वगृही त्यांच्या स्वागताला विमानतळावरच मोठी गर्दी पाहायला मिळाली. नागपुरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा झाली. फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी सुमारे दीड तास ही चर्चा झाल्याची माहिती आहे. नागपुरात संघ शिक्षा वर्ग सुरु असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व प्रमुख अधिकारी सध्या नागपुरात आहेत. त्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी फडणवीसांच्या घरी आले, आणि तेथे सुमारे दीड तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अचानकच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांची जबाबदारी स्वतःवर घेत सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यानंतर, संघ ही सक्रिय झाल्याचं आजच्या बैठकीतून दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून मोदी आणि शाळांची भेट घेणार आहेत.