
नागपूर- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खेद व्यक्त केल्यावर आता अजित पवारांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत माघार घेतली आहे. संजय राऊत हे मोठे नेते असून त्यांचे वक्तव्य मी मनाला लावून घेत नाही, इतरांनी तरी ते कशाला मनाला लावून घ्यावे, अशी प्रतिक्रिया आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कुठलाही वाद नसून आम्ही पक्ष म्हणून भूमिका मांडत असतो, असे पवार म्हणाले.
प्रसार माध्यमांना उद्देशून अजित पवार म्हणाले की, संजय राऊत हे मोठे नेते आहेत. राज्यसभेचे सदस्य आहत. त्यांचे वक्तव्य मीच मनाला लावून घेत नाही, तर तुम्ही तरी कशाला लावून घेता? नाराज कार्यकर्त्यांना मी समजावून सांगेल. त्यांची काळजी तुम्ही करू नका, असेही ते म्हणाले.
संजय राऊतांनी संयम ठेवावा, असे तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला असता अजित पवार म्हणाले, संजय राऊत हे एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याने काय बोलावे, काय भूमिका मांडावी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल मी काय बोलणार?
संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.