

(Amravti)अमरावती – गेल्या 21 दिवसांपासून अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात आदिवासी कोळी महादेव जातीच्या दोन लोकांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने अमरावतीत कोळी महादेव समाज आक्रमक झाला.बाबा जुवार व गजानन चुणीकर हे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर चढल्यानंतर विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी स्वतः तिसऱ्या माळ्यावर जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यांना आश्वासन देऊन बैठकीसाठी खाली आणले.
दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ नागरिक कार्यालयात ठिय्या आंदोलनाला बसले होते. महादेव कोळी जमातीला अनुसूचित जमातीच जात प्रमाणपत्र द्यावे, महादेव कोळी जातीच्या लोकांना 1950 च्या पूर्वीचा पुरावा मागू नये व अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. उद्या अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील हजारो बांधव अमरावतीत रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. आज मोठ्या प्रमाणावर विभागीय आयुक्त कार्यालयात महादेव कोळी समाज आक्रमक झाला होता.