मुंबईतील दोन ठाकरेंच्या लढती

0

मुंबईतील दोन ठाकरेंच्या लढती.
मुंबई शहरात आपले वर्चस्व राखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती सज्ज झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे तर महायुतीने सुरुवातीपासूनच जागा वाटपात आघाडी घेतली होती. महायुतीतील सर्व पक्षातील मतभेद मिटली मिटले आहेत, असा प्रचार होत आहे. परंतु महायुतीतील उमेदवार वाटपावरून पक्षांतर्गत मतभेद उफाळून झाले आहेत. परंतु मुंबईतल्या दोन लढतींकडे सर्वांचे लक्ष आहे.
रिमोट कंट्रोल चालवणारे ठाकरे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे वरळी आणि दादर या दोन जागांकडे सर्व देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष आहे. वरळी मधून कै. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आदित्य ठाकरे लढत आहे तर दादर मधून बाळासाहेबांचे बंधू कै. श्रीकांत ठाकरे यांचे नातू अमित ठाकरे लढत आहेत. वरळीतून आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी गेले दोन वर्षे भाजप सरसावला होता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासमोर भाजपचा उमेदवार येईल असे वाटत होते. परंतु या मतदारसंघातील परिस्थिती पाहता भाजपने ऐनवेळी पळ काढून बंदूक एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर ठेवली आहे. त्यासाठी आयुष्यभर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणारे अमराठी नेते कै. मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली आहे. गांधी कुटुंबांचे निष्ठावान आणि मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा अशी कै. मुरली देवरा यांची ख्याती होती. परंतु काँग्रेसमध्ये आपल्याला भवितव्य नाही अशी उपरती झाल्यामुळे मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. विशेष म्हणजे हेच मिलिंद देवरा हे यूपीए सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलून मिलिंद देवरा यांना त्यावेळी गांधी कुटुंबीयांच्या आग्रहाखातर तरुण वयात केंद्रीय मंत्रिपद मिळाले होते. तेच मिलिंद देवरा काँग्रेस संकटात असताना काँग्रेसची साथ सोडून शिंदे सेनेमध्ये सामील झाले. विशेष म्हणजे शिंदे सेनेमध्ये सामील होताना त्यांच्या सर्व अटी मान्य करण्यात आल्या. मुंबईतील एका मोठ्या उद्योगपतीने यामध्ये मध्यस्थी केली होती. बाळासाहेबांच्या विचारांचे आम्हीच खरे वारसदार आहोत, असा दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या उद्योगपतीला शरण गेले. येथे सांगण्याचा मुद्दा असा की कै. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कधीही कोणाला शरण गेले नाहीत. गणेश नाईक यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यापूर्वी एका मोठ्या उद्योगपतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मध्यस्थी केली होती परंतु त्यांनी त्यावेळी नकार दिला होता. अखेर गणेश नाईक यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्याचा चंग भाजप आणि शिंदे सेनेने केला आहे. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार संदीप देशपांडे हे सुद्धा वरळी मधून रिंगणात उतरले आहेत. राज ठाकरे यांना पूर्ण कल्पना आहे की संदीप देशपांडे हे विजयी होऊ शकत नाही परंतु मराठी मतांमध्ये फूट पडून अमराठी मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा हे विधानसभेत जावेत, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इच्छा आहे. परंतु मराठी जनता सुज्ञ आहे. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. दुसरे म्हणजे स्वतः निवडून येण्यापेक्षा शत्रूला पाडण्यासाठी जे उभे राहतात ते पक्ष कधीच मोठे होत नाहीत . प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी पक्षाचे काय झाले हे आपण पाहत आहोत.
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे रणांगणात उतरले आहेत त्यांनी रणांगणातून पळ काढलेला नाही. योद्धा हा लढाईत उतरताना जय पराजयाची पर्वा करत नाही या उक्तीप्रमाणे आदित्य ठाकरे वरळी मधून लढत आहेत. विजय किंवा पराभव ही वरळी मतदारसंघातील जनता ठरवेलच परंतु केवळ बाळासाहेबांचे नातू नकोत तर अमराठी मुरली देवरांचे पुत्र हवेत हे शिंदे सेनेचे गणित जनतेला समजलेले नाही.

दादर मध्ये काय होणार?
ज्या दादरमध्ये शिवसेनेचे शिवसेना भवन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजगड हे मुख्यालय आहे त्या दादरमध्ये सुद्धा शिवसेना ,शिंदे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी लढत होणार आहे. शिवसेनेने विभाग प्रमुख महेश सावंत यांना येथून संधी दिली आहे. तर शिंदे सेनेने सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे मात्र राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असल्याने ‘ कहानी मे थोडा ट्विस्ट आया है’.
मराठी मतात फूट पाडण्यासाठी राज ठाकरे हे महायुतीला साथ देत असताना भाजपने त्यांचाच गेम केला आहे. ते सुद्धा शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून. सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत शिवसेना फुटी मध्ये ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे पहिल्या यादीतच त्यांचे नाव जाहीर केले गेले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे नाव या मतदारसंघातून जाहीर केले. विशेष म्हणजे भाजपनेते राज ठाकरे यांना भेटून आपली सहानुभूती देत आहेत. त्यामुळे सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव वाढत आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीत आपण उमेदवारी मागे घेणार नाही यावर सदा सरवणकर हे ठाम आहेत. विशेष म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी सरवणकर यांना शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचा आणि शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार आदेश बांदेकर यांचा पराभव झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन सरदेसाई त्यावेळी निवडून आले होते. मात्र पुन्हा घर वापसी झाल्यानंतर सदा सरवणकर यांना पुढच्या निवडणुकीत शिवसेनेने तिकीट दिले आणि ते निवडून आले. सदा सरवणकर यांचा बऱ्यापैकी होल्ड दादर या मतदारसंघावर आहे. ते कोणत्याही परिस्थितीत आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची झाली आहे. महायुतीला मदत करण्यासाठी आपले उमेदवार रिंगणात उतरवणाऱ्या राज ठाकरे यांना जर मदत केली नाही तर दोन दिवसांनी ते आपले सर्व उमेदवार मागेही घेऊ शकतात, अशी गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे.
– नितीन सावंत
– 9892514124