बारामती ॲग्रोवरील कारवाईने राजकारण तापले

0

बारामती- महाराष्ट्र प्रदूषण विभागाने बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता कारवाई केल्याची माहिती असून या (Baramati Agro Plant) कारवाईमुळे राजकारण तापले आहे. रात्री दोन वाजता आपल्याला नोटीस देऊन ७२ तासांत प्लांट बंद करण्याची सूचना नोटीशीतून देण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. द्वेष मनात ठेवून दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. रोहित पवार यांनी यासंबंधी ट्विट केले आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले की, संघर्ष करताना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मी बोलतो व ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत असल्याचे ते म्हणाले. माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबांनी काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे, असेही ते म्हणाले.