

बुलढाणा- समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारला ज्या उपाययोजना करता येतील, त्या सरकार करेल. आतापर्यंत येथे जे अपघात झाले आहेत, ते चालकांच्या चुकीमुळे, डुलकी आल्याने झाले असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. असे अपघात होऊन चालणार नाही.सरकारला प्रत्येकाच्या जीवाची काळजी आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून, ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्या सरकार करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्यातील सिंदखेडा राजा शहराजवळील समुद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण बस अपघाताची घटना घडली आहे. या बस अपघातात 25 जणांचा दुर्घटनेत होरपळून मृत्यू झाला.तर सुदैवाने या अपघातातून 8 जण बचावले असून ते जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पाहणी केली व त्यानंतर ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिंदे यांनी सांगितले की, अपघातातील जखमींवर तात्काळ चांगले उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. क्युआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हेकल) घटनास्थळी तातडीने पोहोचले होते. पोलिसांपासून फायरबिग्रेड या यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. पण बसचे दरवाजे बंद असल्याने त्यांना बाहेर काढता आले नाही. अन्यथा आणखी काही प्रवाशांचे प्राण वाचविता आले असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येकाने नियमांचे पालन केले पाहिजे. ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे गाड्या चालवल्या पाहिजेत. पण काही बाबतीत ते घडताना दिसत नाही. त्यामुळे लेन कटींग आणि ओव्हरस्पीडसाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील, त्या करण्यात येतील. तसेच भविष्यात अपघात रोखण्यासाठी सरकार कटीबद्ध असेल, असेही ते म्हणाले.