जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य..

0

आज तोडगा निघणार?

मुंबई MUMBAI  : MARATHA ARAKSHAN मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते  Manoj Jarange मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती मंत्री दिपक केसरकरांनी दिली. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाली असून जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत, असे केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलनावर आता तोडगा निघणार काय, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. दुपारी दोन वाजता मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. आता मागण्या तर मान्य झाल्या. पण, त्याची अमंलबजावणी ही शासकीय विहित नियम असतात, त्याप्रमाणे होत असते. पंरंतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, आत्तापर्यंत आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो. आता ही नवी प्रकिया पूर्ण केल्यानंतर ही संख्या ५० लाखांच्या वरती जाणार आहे. त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असेही केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान, मनोज जरांगे हे वाशी येथील शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलकांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या भेटीत चर्चेची माहिती देणार असून आंदोलनावर तोडगा निघणार का, याकडे लक्ष लागलेले आहे.