

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar): राज्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सिल्लोड तालुक्यातील विविध ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. सिल्लोड तालुक्यात गुरुवार व शुक्रवारी गारपीट व अवकाळी पावसामुळे मका, बाजरी, ज्वारी, कांदा, कापूस, मिरची, आंबा, फळबाग , उन्हाळी पालेभाज्या तसेच शेडनेटचे अतोनात नुकसान झाले.गुरुवार, शुक्रवार रोजी अचानक अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हे आसमानी संकट आहे. शेतकऱ्यांनी या आसमानी संकटाचा धैर्याने मुकाबला करावा. शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत आहे.प्रशासनाकडून सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केली जातील, एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहणार नाही व नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना शासन मदत करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा अशा शब्दांत मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. शुक्रवारी सिल्लोड तालुक्यातील अन्वी, रहिमाबाद,आसडी ,सारोळा, पालोद, चिंचपुर, चांदापूर आदी गाव शिवारातील नुकसानग्रस्त भागाची ना. अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली आहे.