

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. विधानसभेच्या 70 जागांपैकी 48 जागांवर भाजपचा विजय झाला. तर 22 जागांवर आम आदमी पार्टीचा विजय झाला. या निकालानंतर तब्बल 12 वर्षाची आपची सत्ता गेली आहे. तर 27 वर्षानंतर भाजपचं दिल्लीत कमबॅक झालं आहे. काँग्रेसला या निवडणुकीतही खातं उघडता आलं नाही. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि आपचा चेहरा असलेले अरविंद केजरीवालच पराभूत झाले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. तर मुख्यमंत्री आतिशी यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. यावरून आपची दिल्लीतील अवस्था काय झाली याची कल्पना येते. पण दिल्लीत आपचा इतका दारूण पराभव कसा झाला? यामागची कारणं काय आहेत?
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 तारखेला मतदान झालं. आणि 8 फेब्रुवारी रोजी निकाल आला. यातील 48 जागांवर भाजप तर 22 जागांवर आपचा विजय झाला. आपने 2015मध्ये 67 आणि 2020मध्ये 62 जागांवर विजय मिळवला होता. म्हणजे आपला या निवडणुकीत 40 जागा गमवाव्या लागल्या आहेत. काँग्रेसला या निवडणुकीत तिसऱ्यांदा खातंही उघडता आलं नाही. पण काँग्रेसने या निवडणुकीत आपच्या 13 जागा पाडल्याचं दिसतंय.
2020च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत आपला थेट 40 जागांचं नुकसान झालं आहे. आपला 2020च्या निवडणुकीत 62 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना फक्त 22 जागा मिळाल्या आहेत. तर 2020च्या निवडणुकीत फक्त 8 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 48 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे भाजपच्या 40 जागा वाढल्या आहेत. म्हणजे आम आदमी पार्टी जेवढ्या जागांवर पराभूत झाली, त्या सर्व जागा भाजपने जिंकल्या आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अनेक मोठे चेहरे आपला मतदारसंघ राखू शकले नाहीत. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बडे नेते पडण्याच्या या यादीत फक्त आपचे नेते नाहीत तर भाजपचेही नेते आहेत. आपचे नेते, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले. तर मतदारसंघ बदलूनही उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पराभूत झाले. आपचे माजी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, कॅबिनेट मंत्री सौरभ भारद्वाजही पराभूत झाले आहेत. माजी कायदेमंत्री सोमनाथ भारती आणि राखी बिडलान यांनाही पराभव पाहावा लागला आहे. भाजपमध्ये पक्षाचे दिग्गज नेते रमेश बिधुडी यांचा पराभव झाला आहे. त्यांना एम आतिशी यांनी पराभूत केलं.
2025ची विधानसभेची निवडणूक आपसाठी लाभदायक ठरली नाही. पक्षाचे अनेक बडे नेते पराभूत झाले. तर काही बडे नेते मात्र विजयी झाले आहेत. यात आतिशी यांनी कालकाजी येथून विजय मिळवला आहे. भाजपच्या मोठ्या चेहऱ्यांकडे पाहिले तर प्रवेश साहिब सिंह वर्मा यांनी केजरीवाल यांचा पराभव केला. कपिल मिश्रा यांनी करावल नगर मतदारसंघातून आपच्या मनोज त्यागींचा पराभव केला. त्याशिवाय अरविंदर सिंग लवली, विजेंद्र गुप्ता, मनजिंदर सिंह सिरसा यांचा विजय झाला आहे.
या निवडणुकीत आपचं मोठं नुकसान झालं. त्याला काँग्रेसही जबाबदार असल्याचं सांगितलं जातं. दिल्लीतील कमीत कमी 13 जागा अशा आहेत की तिथे काँग्रेसने आमच्या उमेदवारांना पाडलं. जर दिल्लीत आप आणि काँग्रेसची युती झाली असती तर केजरीवाल विजयी झाले असते का? या सर्व जागांवर काँग्रेसची आपला साथ मिळाली असती तर आज दिल्लीचा निकाल काही वेगळाच असता का. आदी प्रश्न राजकीय चर्चत आहेत.
फक्त काँग्रेसच नव्हे तर असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षने भाजपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दिल्लीच्या मुस्लिम बहुल मुस्तफाबाद मतदारसंघात भाजपचा विजय झाला. दिल्लीत काही जागांमध्ये विजयाचं अंतर खूप मोठं होतं. आणि काही जागांवर विजयाचं अंतर अत्यंत कमी होतं.
दिल्लीतील मुस्लिमबहुल मतदारसंघाकडे पाहिलं तर सीलमपूर, ओखला, मटिया महल, मुस्तफाबाद आणि बल्लीमारान मतदारसंघ हे महत्त्वाचे आहेत. इथेही आपने विजय मिळवला आहे. तर मुस्तफाबाद विधानसभा सीटचा निकाल आश्चर्यकारक राहिला आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघ असूनही या ठिकाणी भाजपच्या मोहन सिंग बिष्ट यांनी मोठा विजय मिळवला आहे.
खरं तर, दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी 18 जागा या ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जातात. या 18 पैकी 13 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे, तर आम आदमी पक्षाला फक्त 5 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. ज्या 13 जागा भाजपने जिंकल्या त्यापैकी 6 जागांवर भाजपची मतदान टक्केवारी 50 हून अधिक आहे. यावरूनच भाजपच्या ग्रामीण भागातील लाटेची कल्पना करता येऊ शकते.
दिल्लीची सत्ता काबीज करणाऱ्या भाजपला 45.61 टक्के मते मिळाली. तर सलग दुसऱ्यांदा सत्तेत असलेल्या आपला 43.55 टक्के मते मिळाली. व्होट शेअरकडे लक्ष टाकले तर पाच मोठ्या पक्षांपैकी बीजेपी (45.56%), आप (43.57%), काँग्रेस (6.35%), जेडीयू (1.05%) आणि एआयएमआयएम (0.77%) ला मते मिळाली आहेत.
2015च्या विधानसभा निवडणुकीत आपला 54.5 टक्के तर 2020च्या निवडणुकीत आपला 53.8 टक्के मते मिळाली होती. म्हणजे या निवडणुकीत आपने फक्त सीटच गमावल्या नाहीत तर त्यांच्या व्होट शेअरलाही मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे भाजपला 2020च्या विधानसभा निवडणुकीत 38.51 टक्के मते मिळाली होती. काँग्रेसला यावेळी दिलासा मिळाला आहे. काँग्रेसला एकही जागा मिळाली नसेल पण त्यांच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. 2020च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 4.26 टक्के मते होती. 2025च्या निवडणुकीत हा आकडा वाढून 6.35 टक्के झाला आहे.
27 वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेवर भाजपने कब्जा केला. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा झालेला पराभव आणि भाजपचा ऐतिहासिक विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. या विजयाने दिल्लीच्या ग्रामीण भागातील आम आदमी पक्षाच्या वर्चस्वाला तडा गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
- Deonath Gandate