
दोघे गजाआड-दोघे फरार, बारमधील शुल्लक वाद भोवला
अमोल खोडे @ अमरावती: गुरुवारी रात्री मध्यरात्री शहरातील इर्विन चौक येथील रसूल कँटीनजवळ एका युवकाची धारदार चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. अजय कंगाले असे त्या मृतक युवकाचे नाव असून त्याचे हत्येप्रकरणी पोलिसांनी हमालपुरा निवासी उज्वल चव्हाण व आकाश सुरोसे या दोघांना अटक केली असून अन्य फरार आरोपी नवनीत संतोष पवार (हमालपुरा) व आकाश हरले (गाडगे नगर) यांचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद आबरावजी इंगोले (वय 40 वर्ष रा.केवळ कॉलनी) हा गुरुवारी रात्री त्याच्या मित्रांसोबत दारू पिण्यासाठी हमालपुरा येथील करण बार येथे बसला होता. दरम्यान आरोपी नवनीत पवार हा तेथे आला व काही कारण नसताना अरविंदला शिवीगाळ करू लागला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावर पांघरून घालण्यासाठी हॉटेलच्या वेटरने त्यांना बाहेर काढून दिले. त्यामुळे अरविंद व त्याचा मित्र योगेश चोरे या दोघांनी तेथून निघून लँडमार्क बार मध्ये जाऊन दारू घेतली. दारू पिणे झाल्यावर योगेश चोरे तिथून निघून गेला, आणि अरविंद हा सचिन सदावर्ते व अजय कंगाले सोबत इर्विन चौकात आला. इर्विन चौक येथील रसूलचे चहा कॅन्टीनजवळ ते आपसात चर्चा करीत होते तेवढ्यात नवनीत पवार, आकाश हरले, आकाश सुरोसे, उज्वल चव्हाण हे चौघेही तेथे पोहचले व पुन्हा वाद करू लागले. दरम्यान आरोपी आकाश हरले याने अजय कंगालेवर लोखंडी रॉडने हल्ला केला. बचावासाठी धावलेल्या अरविंद इंगोले यास रॉडने मारून आरोपी उज्वल चव्हाण व आकाश सुरोसे या दोघांनी अजय कंगाले याला पकडून ठेवले व आरोपी नववीत संतोष पवार याने त्याच्याकडील चाकू अजय कंगाले याच्या पोटात भोकसला आणी अजयला रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पळून गेले. त्यानंतर अरविंद इंगोले व सचिन जनार्दन सदावर्ते यांनी जखमी अजय कंगालेस रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी कलम 302,307,507,120 (ब),34 भा. द.वी. सहकलंम 135 म.पो.का.नुसार गुन्हा दाखल करून चारपैकी दोन आरोपीस अटक केली तर अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचे सांगितले.