

नागपूर, 19 डिसेंबर
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी, आज पंडित निलाद्री कुमार, तबला वादक ओजस अढीया, ग्रॅमी अवॉर्डने सन्मानित राकेश चौरासिया, उस्ताद तोफिक कुरेशी यांच्या सतार, तबला, बासरी व तालवाद्यांच्या अद्भुत संगमाने ईश्वरीय सूरसाधनेची सुरेल अनुभूती लाभली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कलागुणांचा संगम असलेला हा खासदार सांस्कृतिक महोत्सव हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, महामेट्रोचे प्रबंध निर्देशक श्रावण हर्डीकर, सुनील मेंढे, देशोन्नतीचे प्रकाश पोहरे, परशू ठाकूर, दादाराव केचे, प्रेरणा कॉन्व्हेन्टचे जोशी, राहुल पांडे, मोहित शाह आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी श्रुती तृप्त करणारा शास्त्रीय राग जयजयवंती सादर करण्यात आला. सप्तसुरांचा लाघवी अनुनय, नम्र आराधना, आळवणी, आर्जव तसेच खट्याळ सूरक्रीडा, वाद्यवादना द्वारे दिले, घेतलेले व लीलया पेललेले मधुर आव्हान रसिकांना सुखावून गेले. संगीताच्या या ऐश्वर्यसंपन्न मैफिलीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कीबोर्ड वर अग्नेलो फर्नांडिस आणि घटम वर गिरिधर उदुपा यांनी अननुभूत साथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व डॉ रिचा सुगंध यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, शैलेश ढोबळे, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, रेणुका देशकर, अब्दुल कादीर, प्रमोद पेंडके यांनी केले.