

लयतत्वाद्वारे कलाकारांची डॉ विनय वाईकर यांना मानवंदना
नागपूर (Nagpur) , 29 डिसेंबर डॉ. विनय वाईकर यांच्या स्मृतीनिमित्त वाईकर परिवार व सप्तकतर्फे आयोजित ‘‘शुक्रगुजारी (कृतज्ञता) – ओंजळीतले सोनेरी क्षण’’ या कार्यक्रमात आज लयतत्वाद्वारे मानवंदना देण्यात आली.
कवी कुलगुरु कालीदास सभागृह, परसिस्टन्ट सिस्टिम्स, गायत्रीनगर येथे ही काव्य गायनाची अनोखी मैफील पार पडली. कृतज्ञतेच्या भावनेने भारावलेल्या या कार्यक्रमात प्रसिध्द गायिका विभावरी जोशी, लोकप्रिय गायक ऋषीकेश रानडे आणि रसिकांचे आवडते कवी वैभव जोशी यांचा सहभाग होता.
सगुण निर्गुणानंतर कलाकारांना जाणवणारा देव म्हणजे रंगदेवता, असे सांगत वैभव जोशी यांनी मैफलीला सुरुवात केली. विभावरी जोशी आणि ऋषीकेश रानडेे यांनी ‘‘पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो’’ ही नांदी गात रसिकांचे मन जिंकले. त्यानंतर त्यांनी गायिलेल्या ‘‘तू बुध्दी दे, तेज दे, स्वर आले दुरुनी, अवचिता परिमळू, मन रे तू काहे ना धीर धरे, जमींसे हमें आसमाँपर, पिया तोसे नैना लागे रे, पाहिले न मी तुला, चिंब पावसानं रान झालं आबादानी, भय इथले संपत नाही, सुनसान गलींमें, दिव्यत्वाची जेथ प्रतिती’’ या गीतांनी मैफील उत्तरोत्तर बहरत गेली.
वैभव जोशी यांनी त्यांची प्रसिध्द कविता नांदी, डोह सादर करीत नागपूर नगरीचे भूषण कवी ग्रेस, सुरेश भट यांच्या कवितावाचनाने कार्यक्रमात रंगत आणली. प्रत्येक आठवणींचा सोहळा गंभीर असू नये, असे म्हणत काही खुसखुशीत कवितांनी त्यांनी रसिकमनाचा ताबा घेतला. रंगमंच, पालक, पं. ह्दयनाथ मंगेशकर, बाबूजी, नरेंद्र भिडे, मोहम्मद रफी, प्रभाकर जोग यांच्यासह आयुष्यावर अमिट छाप उमटविणार्या व्यक्तींप्रती कृतज्ञता बाळगत कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कलाकारांच्या ह्दयाचे अनेक कप्पे आज उघडले गेले आणि श्रोतुवृंदांना आपल्या लाडक्या गायक, कविला अधिक उत्तमपणे जाणता आले. स्वा. विनायक सावरकर यांच्या जयोस्तुते या जोशपूर्ण वीररसयुक्त गाण्याने प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचलेल्या या कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रास्ताविक डॉ. उदय गुप्ते यांनी केले. महेंद्र ढोले, गोविंद गडीकर, अरविंद उपाध्ये, अमर शेंडे, गौरव टांकसाळे, अशोक टोकलवार, विक्रम जोशी, सुभाष यांनी वाद्यसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमित वाईकर यांनी केले. डॉ. विनय वाईकर यांच्या कन्या डॉ. मनिषा पटवर्धन आणि डॉ. पल्लवी वाईकर सिन्हा यांनी उपस्थितांशी ह्द्य संवाद साधला. अतिथींचे स्वागत डॉ. सुधीर भावे यांनी केलेे. याप्रसंगी प्रसिध्द अभिनेत्री भारती आचरेकर, सप्तकचे संस्थापक विलास मानेकर, अपर्णा वाईकर यांची उपस्थिती होती.