‘गर्जा महाराष्ट्र माझा’ मध्‍ये नृत्य-संगीताचा अपूर्व संगम

0

– महाराष्‍ट्र दिनानिमित्‍त 500 कलावंतांचे सुरेख सादरीकरण
नागपूर (NAGPUR), 3 मे
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत सांस्कृतिक कार्य संचालनालय, आविष्कार कला अकादमी तसेच सृजन ऑव्हिओज नागपूर यांनी संयुक्तरित्या सादर केलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझ्या’ या संगीत, नृत्याच्या कार्यक्रमातून राज्याची सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि शिवरायांच्या शौर्याच्या अभुतपूर्व धांडोळ्याने रसिकांना तृप्तीची अनुभूती दिली.
कार्यक्रमाचा प्रारंभ आ. प्रवीण दटके आणि आ. संदीप जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्चलनाने झाला. यावेळी संस्कार भारतीचे राष्ट्रीय मंत्री आशुतोष अडोणी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सहायक संचालक संदीप शेंडे, संगीत संयोजक अमर कुळकर्णी व संस्कार भारतीचे गजानन रानडे उपस्थित होते.

नागपूरसह विदर्भात सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमाण वाढत असून मंत्री आशिष शेलार नागपूरकडे विशेष लक्ष देत आहे. यातून कलावंत घडण्यास मदत होईल असे मत आ. प्रवीण दटके यांनी व्यक्त केले तर नागपूर शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होत असल्याचे आ. संदीप जोशी यांनी व्यक्त केली.
कवि राजा बढे लिखित राज्य गीतापासून कार्यक्रमास प्रारंभ झाला. घनश्याम सुंदरा (वासुदेव वारी), झुंजुमंजू पहाट झाली (भूपाळी), आम्ही ठाकरं (आदिवासी संस्कृती), विठुरायाचा गजर, अफजलखान वधावरील नाट्य, हे हिंदु शक्ती गीत, मोरयाचा गजर, अंबाबाईचा जोगवा, अहल्याबाई होळकर यांच्या कार्यावरील नाट्यप्रवेश, महिलांचे पारंपरिक खेळ, अरे कान्हा हे गीत, डॉ. हेडगेवार यांच्या जीवनावरील नाट्य, जननी जन्मभूमी, भारतीय घटनेचा तू हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील नाट्य, भुवरी रावण वध झाला, मथुरेच्या बाजारी ही गौळण, लखलख चंदेरी हे आयकॉनिक गीत आदी बहारदार सादरीकरण या कार्यक्रमात कलावंतांनी केले.

माऊलीच्या गजरात प्रेक्षकांमधून निघालेली दिंडी रसिकांना अतिशय भावली. वादकांचा भव्य संच आणि नृत्यांचा संच यांनी रंगमंचाचा सुरेख वापर केल्याचे जाणवले. डॉ. मंजिरी वैद्य, सायली मास्टे, भाग्यश्री बारस्कर, मुकूल पांडे या गायकांसह मोरेश्वर दहासहस्त्र, नंदू गोहाणे, सोहम रानडे, आर्य पुराणकर यांचा समावेश होता. कुणाल आनंदम, अवंती काटे, डॉ. दीपाली घोंगे आदी प्रमुख कलावंतांच्‍या चमूने उत्‍कृष्‍ट नृत्‍य सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन मृण्मयी कुळकर्णी आणि गौरव खोंड यांनी अतिशय सुरेख केले.