
रायपूर (Raipur) , 21 जानेवारी : छत्तीसगडच्या गरियाबंद येथे सुरक्षादल आणि नक्षलवादी चकमकीत आतापर्यंत 27 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंत पोलिसांनी 16 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्याचे सांगितले.
छत्तीसगडमधून नक्षलवादाचे समूळ उच्चाटनाच्या दिशेने सरकारने कंबर कसली आहे. त्यानुसार सुक्षादलाच्या 1000 जवानांनी छत्तीसगड- ओडिशा सीमेवरील गरियाबंद येथे नक्षलवाद्यांना घेराव घालतला. यावेळी सुरक्षा दलांनी नक्षल्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले होते. मात्र नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरूच ठेवला. त्यानंतर पोलिसांनी सडेतोड प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांचा मुकाबला सुरू केला. या प्रदीर्घ चकमकीत 27 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे.
यापरिसरात अजूनही पोलिसांची कारवाई सुरूच असून आणखी नक्षलवादी या ठिकाणी असल्याची माहिती समोर आली आहे. ठार केलेल्या 27 नक्षलवाद्यांपैकी 16 जणांचे मृतदेह ताब्यात घेत त्यांची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या चकमकीत 1 कोटींचे बक्षीस असलेला जयराम उर्फ चलपती ठार झाला असून यासह सीसीएम मनोज आणि गुड्डू नक्षलवादीही ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती रायपूर झोनचे आयजी अमरेश मिश्रा यांनी दिली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही नक्षलवादी या ठिकाणी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षादल हा परिसर पिंजून काढत आहेत.













