रायगड : जिल्ह्यात खालापूरजवळ कर्जत तालुक्यात इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडली आहे. पावसामुळे इर्शाळवाडीवर दरड कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे उपस्थित आहेत. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत २५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर २१ जणांवर नवी मुंबईतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. वाचवण्यात आलेल्या २५ जणांपैकी ४ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.उद्योगमंत्री उदय सामंत आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे घटनेची पाहणी करण्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाले आहेत. दरम्यान, बचाव पथकांनी आतापर्यंत २२ जणांची सुखरूप सुटका केली आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. सध्या पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे १०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी बचाव कार्यात गुंतले असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. यासह बचावकार्यात एनडीआरएफ, स्थानिक आणि काही स्वयंसेवी संस्थांकडून मदत मिळत असल्याचंही पोलिसांनी सांगितलं
इर्शाळवाडी हे एक छोटंसं गाव असून त्या गावात ५० ते ६० घरांची वस्ती आहे. पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक गावकरी माती-खडकांच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल (बुधवार, १९ जुलै) रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
घटनास्थळाच्या परिसरात गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे. अतिशय भीषण आणि मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत बचावकार्य सुरू झालेलं नव्हतं. अधून मधून जोरदार पाऊस सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत मदत आणि बचावकार्याचा आढावा घेत आहेत.