

नंदुरबार, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद गावाजवळ २ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. एका भरधाव बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकींना चिरडले, त्यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ऐन दिवाळीत या घटनेमुळे मृतांचे कुटुंब आणि गावकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. (A speeding Bolero crushed three two-wheelers; Five people died)
या अपघातात योगेश कालूसिंग नाईक, राहुल धर्मेंद्र वळवी, अनिल सोन्या मोरे, चेतन सुनील नाईक आणि श्रीकृष्ण लालसिंग ठाकरे यांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी एक दुचाकी नादुरुस्त झाली होती. त्यामुळे त्या मदतीसाठी दोन अन्य दुचाकी तेथे थांबल्या होत्या. याच वेळी नंदुरबारहून धानोराकडे जाणारी बोलेरो वाहन भरधाव वेगात आली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकींना जोरदार ठोकर मारली. या धडकेत बोलेरोने दुचाकींना चिरडले त्यानंतर बोलेरो उलटली.
अपघाताची माहिती मिळताच जखमींना तत्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती, त्यांचा आक्रोश आणि शोक पाहून अनेकांची मनं हेलावली.
राज्यात वाहन अपघातांचे प्रमाण वाढले असून रस्त्यांवरील वाहतुकीच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेत दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात अचानक दुःखाच्या सावटाखाली आलेल्या कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत दुःखदायक आहे.