

प्रकल्पग्रस्त शेतकरी व कर्नाटक एम्टातील अधिकारी यांच्यात खासदार धानोरकर यांच्या नेतृत्त्वात बैठक.
भद्रावती स्थित कर्नाटक एम्टामधील संचालक मंडळ व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात मा. खासदार प्रतिभा धानोरकर, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलिस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थित आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे कर्नाटक एम्टातील संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी मान्य केले.
कर्नाटक एम्टा व बंराज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु होते. या आंदोलना दरम्यान प्रकल्पग्रस्तांवर व पदाधिकाऱ्यावर गुन्हे देखील दाखल झाले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडून कोळसा खान देखील बंद पाडण्यात आली. या सर्व आंदोलनाच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजु घेत मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एम्टातील संचालक मंडळ, अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात नियोजन भवन येथे आज दि. 22 जुन रोजी बैठक घडवून आणली. सदर बैठकीत 2006 पासून प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांना नौकरी, पुर्नवसन, शेतकऱ्याची नुकसान भरपाई या सर्व विषयाच्या अनुषंगाने मार्ग काढण्यात आला. यावेळी एम्टा मधील अधिकाऱ्यानी तात्काळ नोकरी व शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे देण्याचे मान्य केले. त्यासोबतच अनुकंपातील नौकरीचा प्रश्न देखील प्राधान्याने सोडविण्याचे मान्य केले. मा. जिल्हाधिकारी यांनी कंपनीतील अधिकारी यांना जुलै महिन्यापर्यंत सर्व मागण्या मान्य करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याना न्याय देण्यात यावा असे तोंडी आदेश दिले. मा.खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्याना प्रकल्पग्रस्तांना न्याय देतांना कंपनीने गावकऱ्याना विश्वासात घेऊन संपुर्ण मागण्या पुर्ण कराव्या असे देखील सांगितले. यावेळी प्रकल्पग्रस्त गावातील सरपंचांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या समक्ष गावकऱ्याच्या मागण्या मांडल्या. भविष्यात या मागण्या पुर्ण न झाल्यास अधिकाऱ्यानी संबंधीत कंपनीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी देखील उपस्थितांपैकी करण्यात आली. यावेळी कर्नाटक एम्टा संचालक मंडळाकडून आजवर अनेक आश्वासने चुकीचे दिले हे मान्य करुन भविष्यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पुर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरीक जो निर्णय घेतील त्यांच्या सोबत आपण राहणार असल्याचे सांगितले. यावेळी मा. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत मा. जिल्हाधिकारी, मा. पोलिस अधिक्षक, मा. पोलिस विभागीय अधिकारी, मा. तहसिलदार भद्रावती, कंपनीचे संचालक मंडळ व अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त गावातील सरपंच व शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.