व्हीएमए तर्फे ‘बुक टू बोर्डरुम’ या विषयावर सत्र आयोजित

0

पुस्तकांमधून मिळणाऱ्या व्यवसायविषयक ज्ञानावर झाला उहापोह

 

नागपूर(Nagpur):- विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे “मॅनेजमेंट इनसाइट्स: फ्रॉम बुक टू बोर्डरूम” या विशेष सत्रामध्‍ये सहा पुस्‍तकप्रेमींनी विविध बेस्टसेलर पुस्तकांमधील व्यवसायविषयक मुद्दयांवर प्रकाश टाकला. चिटणविस सेंटर येथे झालेल्‍या या कार्यक्रमात अनुप वानखेडे यांनी डॅनियल काहनेमन यांच्या “थिंकिंग, फास्ट अँड स्लो” यापुस्‍तकावर प्रकाश टाकताना व्यक्तीच्या प्रश्न तयार करण्याच्या पद्धतीमुळे त्याच्या जलद किंवा संथ विचारांना चालना मिळते, हे स्पष्ट केले. मृण्मयी येटे यांनी गॅरी केलरच्या “द वन थिंग” पुस्तकामधील मधील व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरण्‍यात येणा-या डोमिनो इफेक्ट कडे त्यांनी लक्ष वेधले.

तर सुमित पृथ्यानी यांनी बर्नहार्ड मोस्टल यांच्या “शाओलिन: हाऊ टू विन विदाउट फाईटिंग” या पुस्तकावर चर्चा करताना वर्तमान, सजगता, दृढनिश्चय आणि अलिप्तता या गुणांवर जोर दिला. प्रेरणा कोटेचा यांनी अवधीश सिंग यांच्या “द सीक्रेट रेड बुक ऑफ लीडरशिप” बद्दल सांगितले. नेतृत्व गुणांसाठी स्वतः मध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे त्या म्हणाल्या. डॉ. अलिअकबर मैमुन यांनी जेम्स सी. कॉलिन्सच्या “गुड टू ग्रेट” या पुस्‍तकाचा दाखला देत ‘गुड टू ग्रेट’ असे परिवर्तन साध्‍य करण्यासाठी उत्कृष्टतेसह व्यावहारिक आणि वचनबद्धतयुक्त दृष्टिकोन आवश्यक असल्‍याचे सांगितले. शेवटी सचिन जहागीरदार यांनी जॉय आलुक्कास यांच्या “स्प्रेडिंग जॉय” या पुस्‍तकाच्‍या माध्‍यमातून यशस्वी व्यावसायिकाच्या दृष्टीकोनातून उत्तराधिकार आणि निवृत्ती यासारख्या विषयांवर चर्चा करताना लेखकाचा प्रवास उलगडला. सत्राचे सूत्रसंचालन शंतनू शेंडे यांनी केले, रोहित दुजारी यांनी कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले.