

नागपूर(Nagpur), 28 मे लेखक अनंत जोशी यांनी लिहिलेली ‘काश्मीर-ए-तालिबान २०३२’ ही आगळ्या-वेगळ्या प्रकारची कादंबरी आहे. लेखकाने कादंबरीला काल्पनिक किंवा फॅन्ट्रसी म्हटले असले तरी ही केवळ अद्भुतरम्य रोमांचक कादंबरी नसून ती २०३२ सालची वस्तुस्थिती मांडते. आज २०२४ साल सुरु असले तरीही भविष्यातील काळ कादंबरीकार समर्थपणे उभा करु शकला आहे. कारण साहित्यिकांमध्ये असलेले द्रष्टेपण अनंत जोशी यांच्यात दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि सुप्रसिध्द वक्ते, समीक्षक डॉ. वि. स. जोग यांनी केले.
लेखक अनंत जोशी यांनी लिहिलेल्या ‘काश्मीर-ए-तालिबान २०३२’ या कादंबरीचे प्रकाशन डॉ. वि. स. जोग यांच्या हस्ते झालेल्या. डॉ. वि. स. जोग यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या समारंभाला स्वेअर मिडीयाच्या संचालिका पत्रकार मंजुषा जोशी व विदर्भ साहित्य संघाचे ग्रंथालय संचालक प्रा. विवेक अलोणी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कादंबरीची रचना गुतांगुंतीची असली तरी ती वाचकाची उत्सुकता जागविणारी आणि सस्थितीतील परिस्थितीची तुलना वास्तविकपणे करता येऊ शकणारी एक अपवादात्मक अनन्य साधारण कादंबरी असल्याने वाचक तिचे नक्कीच स्वागत करतील, असे डॉ. जोग म्हणाले. या प्रसंगी डॉ. जोग, मंजुषा जोशी यांचा अनंत जोशी आणि स्नेहल जोशी यांनी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. मंजुषा जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले व लेखकाला शुभेच्छा दिल्या. अनंत जोशी यांनी कादंबरीलेखनामागची भूमिका मांडली. या कार्यक्रमाला सौ. शैलजा जोग, अमित जोग आणि अनन्या जोग हे आवर्जुन उपस्थित होते.