

मुंबई (Mumbai) :
रिझर्व्ह बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra, newly elected Governor of Reserve Bank of India) यांची सही असलेली ५० रुपयांची नवी नोट लवकरच वापरात येऊ घातली आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकत्याच प्रसृत केलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, लवकरच ५० रुपयांची नवी नोट बाजारात आणली जाईल. या नव्या नोटेवर महात्मा गांधींचा फोटो कायम असणार असून रंगसंगतीही आधीच्याच नोटेसारखीच असणार आहे. मात्र, यावर एक महत्वपूर्ण बदल असणार आहे, तो म्हणजे यावर रिझर्व्ह बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची गव्हर्नर म्हणून सही असणार आहे. डिंसेंबर २०२४ मध्ये रिझर्व्ह बँकेचे मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या सहीने छापली जाणारी ही पहिलीच नोट असणार आहे.
देशातील मध्यमवर्गासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या सरकारच्या मोहिमेतकेंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवत सुखद धक्का दिला असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेनेही आपल्या त्रैमासिक पतधोरण बैठकीत रेपो दरात कपात करत, सामान्यांच्या डोक्यावरचे कर्जाच्या व्याजदरांचा बोजा उतरवण्यास मदत करण्याचे धोरण अनुसरले आहे. आता त्यापाठोपाठ भारतीय रिझर्व्ह बँकेने हा अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या निवेदनात स्पष्ट सांगितले आहे की, जुन्या म्हणजे आता चलनात असणाऱ्या ५० रुपयांच्या नोटेला अजिबात धक्का लागणार नाही. ही नोट आहे तशीच चलनात राहील आणि तिचे मूल्यही तेवढेच राहणार आहे. त्यामुळे याबाबत कुठल्या अफवा पसरवल्या जात असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नये, असेही रिझर्व्ह बँकेच्या या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.