ओंगळ प्रदर्शन राजकीय व वैधानिक अडाणीपणाचे

0

 

महाराष्ट्रातील सत्तांतराबद्दल आजमितीला तीन ठिकाणी वैधानिक सुनावण्या सुरू असताना व त्यानंतर अंतिम सुनावणी फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ असताना महायुती सरकारच्या पतनासाठी 31 डिसेंबरचे भाकित करणारे संजय राऊत, आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विनायक राऊत यांच्यासारखे कुडमुडे ज्योतिषी आपल्या राजकीय व वैधानिक अडाणीपणाचे ओंगळवाणे प्रदर्शन करीत आहेत.तसे पाहिले तर ते अडाणी नाहीत.चांगले शिकलेसवरलेले आहेत.राजकारणात तर ते तल्लखच आहेत.पण आपल्या खेम्याचे मनोबल कायम ठेवण्यासाठी त्याना हा अडाणीपणाचा बुरखा पांघरावा लागत आहे.म्हणूनच त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंत देव बुडवून ठेवावे लागत आहेत.

काय आहे एकतीस डिसेंबरला? आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्राच्या विधानसभाध्यक्षानी काय काय केले हे पाहण्यासाठी त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.एवढ्या एका सुतावरून ही मंडळी स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यासाठी त्यांची काही गृहितके मनात धरली आहेत.एक म्हणजे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या आमदाराना पात्र ठरविणार आहेत आणि ठाकरे गटाच्या आमदाराना अपात्र ठरविणार आहेत आणि हा निर्णय जेव्हा सर्वोच्च न्यायालयात जाईल तेव्हा सर्वोच्च न्यायालय तो रद्द करणार आहे आणि त्यामुळे महायुती सरकारला राजीनामा द्यावा लागणार आहे. नशीब की, त्या दिवशी आनंद कसा मनवायचा हे या महाभागांनी अद्याप जाहीर केले नाही. अर्थात जाहीर केले नसले तरी त्याच्या योजना यांच्या डोक्यात पिंगा घालत असणारच.

खरे तर न्यायालयाच्या निर्णयाबद्दल अंदाजबाजी करायची नसते.तशी प्रथा आहे. पण ही मंडळी इतकी बेभान झाली आहे की, त्याना त्या प्रथेचे भानही राहिलेले नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की, महाराष्ट्रातील सत्तांतराबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि निर्वाचन आयोग येथे अनेक सुनावण्या सुरू आहेत.आधी त्या सुनावण्या शिवसेनेच्या संदर्भातच होत होत्या.आता त्याना राष्ट्रवादी काॅग्रेसचाही संदर्भ प्राप्त झाला आहे. आमदार अपात्रता प्रकरण, अरूणाचलमधील नबाम रेबीया प्रकरण आणि शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याचा निर्वाचन आयोगाचा निर्णय ही प्रकरणेही सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहेत.राष्ट्रवादी काॅग्रेसमधील फुटीचे प्रकरण निर्वाचन आयोगाच्या विचाराधीन आहे आणि आमदार अपात्रता प्रकरण विधानसभाध्यक्षांकडेही आहे.या तिन्ही व्यासपीठांकडे असलेल्या सुनावणीत कोणताही निर्णय झाला तरीही त्यात सहभागी असलेला कोणता तरी पक्ष त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारच आहे.त्यामुळे एकतीस डिसेंबरला अंतिम निर्णय होईलच याची कुणीही शाश्वती देऊ शकत नाही.ही वैधानिक वस्तुस्थिती असताना एकतीस डिसेंबर रोजी काही तरी भयंकर होणार आहे, भूकंप होणार आहे ,ही मंडळी कशाच्या बळावर म्हणत आहेत हेच कळत नाही.

पण थोडा विचार केला तर कळते की, त्याना आपला कळप पक्का ठेवायचा आहे.कारण जसजसा काळ जात आहे तसतशी शिंदेगटाला आणि महायुती सरकारला आपल्या लोकाभिमुख कार्यामुळे बळ मिळत आहे. मध्यंतरी माठा आरक्षणाचा प्रश्न जरांगे यानी उपस्थित केला.पाठोपाठ आणि यात हात चोळत बसण्याशिवाय काहीही मिळेनासे झाले आहे.त्यामुळे लोकाना पाडून ठेवण्यासा ओबीसीही सरसावले.ती समस्या हाताळताना सरकार कोणती तरी चूक करेल व तिचा फायदा आपल्याला मिळेल अशी आस लावून ही मंडळी बसली होती.पण तो विषयही सरकार योग्यप्रकारे हाताळत आहे.त्यामुळे या महाभागांमध्ये अधिक वैफल्य निर्माण झाले.ते झाकण्यासाठी ही कथित भूकंपाची नौटंकी.

ही मंडळी रात्रंदिवस शिंदे सरकारचा उल्लेख घटनाबाह्य सरकार असा करीत असली तरी ते सरकार मात्र राज्यातील प्रत्येक समस्येला धैर्याने आणि समंजसपणाने तोंड देत आहे.मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आपले प्राण पणास लावणारे आंदोलन केले.ते हाताळणे एरागबाळ्याचे काम नव्हते पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी ते अतिशय कौशल्याने हाताळले.त्यामुळे त्या सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल जनतेच्या मनात नवीन विश्वास निर्माण झाला.त्यामुळे विरोधी पक्ष अस्वस्थ झाला असेल तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल.आपली ती अस्वस्थता झाकण्यासाठी त्यांच्याकडे एकच मार्ग आहे व तो म्हणजे अफवा पसरविण्याचा.एकतीस डिसेंबरचा कथित भूकंप हा त्यातलाच एक प्रकार.

उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आजारपणामुळे कंड्या पिकविण्याची या मंडळीना संधी मिळत असली तरी त्यातून यांचा बुळेपणाच उघड होत आहे.त्यासाठी अजितदादांच्या महायुतीमधील स्थानाबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. वास्तविक आपल्या काकाश्रींच्या विरोधात जाण्यापूर्वी अजितदादानी दहा नव्हे शंभर वेळा आपल्या विश्वसनीयतेचा विचार केला असेल.एक वेळा आपण देवेंद्र फडणविसाना तोंडघशी पाडले.आता पुन्हा जर आपण तसेच केले तर आपली विश्वसनीयता कायमची संपेल व तथाकथित स्वकीयही आपल्याला माफ करणार नाहीत, हे कळण्याइतपत दादा नक्कीच चतुर आहेत.ते जुना खेल तेव्हाच खेळतील जेव्हा त्याना राजकारणसंन्यास घ्यायचा असेल.त्यांची तब्यत आणि पवार परिवाराशी संबंध ह्या केवळ योगायोगाच्या गोष्टी आहेत.राजकारण आणि नातेसंबंध ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

त्याचा एकमेकाशी संबंध जोडायचा नसतो, हे या मंडळीना कळत नाही काय?शरद पवारांशी दादांचे काकापुतण्या असे संबंध आहेत. तशाच स्वरूपाचे शरद पवार यांचे नातेसंबंध दिवंगत शेकाप नेते स्व.एन.डी.पाटील यांचेही होते.एन.डी.पाटील तर पवार परिवाराचे जावई होते.पण त्यावेळी असा संभ्रम निर्माण करण्याच्या भानगडीत कुणीही पडले नाही.आता मात्र दादांच्या बाबतीत तसे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत.केवळ भाबड्या आशेपायी.आपण यावेळी पलटी मारली तर राजकारणात कुठेच राहणार नाही, हे न कळण्याइतपत दादा नक्कीच नवशिके राजकारणी नाहीत.ते सर्वांपेक्षा अधिक आपल्या काकांना ओळखून आहेत.ते कोणत्या स्थितीत काय करू शकतात एवढे दादांना नक्कीच ठाऊक आहे.त्यामुळे ते पुन्हा ‘ काका मला वाचवा ‘ असे कधीच म्हणणार नाहीत. महाआघाडीवाल्यानाही हे कळते.पण त्याना केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी दादांचे नाव घ्यावे लागत आहे एवढेच.

खरे तर विरोधी पक्षांच्या या बालिश चाळ्याना प्रसारमाध्यमे आळा घालू शकत होती.पण त्यानाही आपला जीव वाचविण्यासाठी यांच्यामागे धावधाव करावी लागत आहे. वास्तविक वृत्तवाहिन्यांच्या वृत्त संकलनासाठी अनेक विषय उपलब्ध आहेत पण ते सर्व बाजूला सारून वाहिन्यांचे वार्ताहर नेत्यांच्या मागे धावत आहेत.त्यामुळे आपले हसे होत आहे हेही त्याना कळेनासे झाले आहे.

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर