‘विदर्भ ऍडव्‍हांटेज’ मधील चर्चेत सूर

0

नागपूर भविष्‍यात ‘आयटी’ कंपन्‍यांसाठी आदर्श ठिकाण
नागपूर – डाटा अनॅलिसीस साठी लागणारे अनॅलिटीक माइंड असलेले, स्‍मार्ट आणि स्थिर मनुष्यबळ, महिलांची सुरक्ष‍ितता, उत्‍तम पायाभूत सुविधा, भौगोलिक स्थिती आणि राजकीय स्‍थैर्य अशा अनेक कारणांमुळे नागपूर हे आयटी कंपन्‍यांसाठी भविष्‍यात आदर्श ठिकाण ठरू शकते, असे मत नागपुरातील विविध आयटी कंपनींतील तज्ञांनी व्‍यक्‍त केले.
केंद्रीय महमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या असोस‍िएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलमेंट या संघटनेद्वारे येत्‍या जानेवारी 2024 मध्‍ये खासदार औद्योगिक महोत्‍सव – ऍडव्‍हांटेज विदर्भचे आयोजन केले जाणार आहे. त्‍याअनुषंगाने आयटी कंपन्‍यांमधील तज्ञांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत असोसिएशन फॉर इंडस्ट्रीअल डेव्‍हलपमेंट (एड) चे अध्‍यक्ष आशीष काळे, सच‍िव डॉ. व‍िजय शर्मा यांच्‍यासह अजय कपूर, शैलेश आवळे, व‍िनोद तांबी, अनुप खंडेलवाल, दिनेश नायडू यांचा सहभाग होता.
विप्रो, कॅपजेम‍िनी सारख्‍या मोठ्या आयटी कंपन्‍यांना विदर्भाकडे आकर्षित करण्‍यासाठी येथील मातीत तयार झालेले स्‍टार्टअप, कंपन्‍या यांच्‍या यशोगाधा, सामंजस्‍य करार आदींचा समावेश करण्‍यावर बैठकीत चर्चा करण्‍यात आली. छोट्या आयटी कंपन्‍यांना कमी दरात जागा उपलब्‍ध करून देण्‍यावरही भर देण्‍यात आला. नोकरीसाठी बाहेर गेलेल्‍या युवकांना नागपुरात परत आणण्‍यासाठी पावले उचलली जात असून स्‍थानिक लोकांना आयटी कंपन्‍यांमध्‍ये प्राधान्‍य द‍िले जात असल्‍याचे अजय कपूर यांनी यावेळी सांगितले. नागपूर शहर वेगाने विकसीत होत असून आयटीतील युवकांच्‍या मनोरंजनासाठी ब्रांडेड मॉल्‍स, हॉटेल्‍स, क्‍लब भविष्‍यात विकसीत होतील, असे शैलेश आवळे यावेळी म्हणाले.