
-बार्टीच्या महिला हक्क जाणीव जागृती पर्वाचे उद्घाटन
नागपूर- NAGPUR सावित्रीच्या लेकी आज सुपर मॉम झाल्या आहेत. त्या घर, ऑफीस, मुलं, समाजाची एकाचवेळी जवाबदारी यशस्वीपणे सांभाळतात. मात्र या सर्वात स्वत:ची स्वतंत्र स्पेस जपतांना दिसत नाही. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यात त्यांना स्वत:चा स्वार्थ वाटत असल्याचे मत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांनी व्यक्त केले. बार्टी उपकेंद्रामार्फत आयोजित महिला हक्क जाणीव जागृती पर्वाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
कुटूंबाने घरातील महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण निरोगी महिलाच निरोगी समाज घडवू शकते असे मत त्यांनी अध्यक्षीय मनोगतात प्रकट केले. दिनांक 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. यानिमित्ताने बार्टी उपकेंद्रामार्फत महिला हक्क जाणीव जागृती पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील महिलांचे शासकीय वसतीगृह, महाविद्यालय, विशेष समुहाच्या वस्तीत, टोलीत जाऊन या सप्ताहात महिलांच्या न्याय हक्कासाठी जाणीव जागृतीचे कार्य केले जाणार आहे. सोबतच बार्टी मार्फत राबविल्या जात असलेल्या रोजगारक्षम योजनांची माहितीही सांगीतली जाणार आहे.
क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन या पर्वाचे उद्घाटन करण्यात आले. संविधान प्रस्ताविकेच्या सामुहिक वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बार्टीचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांनी प्रास्ताविक केले. बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हक्क जाणीव जागृती पर्वामागील भूमिका व आवश्यकता समजावून सांगितली. विचारपीठावर आशा कवाडे, संशोधन अधिकारी जात पडताळणी, अंजली चिवंडे, विशेष अधिकारी समाजकल्याण, जयश्री बोदेले सहा. लेखाधिकारी महाज्योती उपस्थित होते.
आज सावित्रीबाईच्या पुण्याईने आपण सारे इथे आहोत. आपण सार्यांनी त्यांचा विचारांचा वारसा पुढे चालविला पाहिजे असे मत आशा कवाडे यांनी व्यक्त केले. तर सावित्रीबाई फुलेंचे सामाजिक कार्य सगळेच जाणतात पण प्रत्यक्ष आयुष्यात त्यांचा विचारांचा अंमल केला जात नसल्याची खंत जयश्री बोदेले यांनी बोलून दाखवली. यावेळी प्रा. डॉ. संगीता टेकाडे यांच्या, मी सावित्रीबाई फुले बोलतेय या एकपात्री प्रयोगाने उपस्थितांना भावूक केले.
उद्घाटनीय सत्रानंतर निमंत्रित कवयित्री संमेलन घेण्यात आले. यात प्रतिभा सहारे, नीशा खापरे
सुषमा कळमकर, सविता धमगाये, सुनंदा जुलमे, रजनी फुलझेले, अर्चना चंदनखेडे, रजनी संबोधी, डॉ. अपर्णा कल्लावार, अनघा मेश्राम, गंगा खांडेकर, निर्मला जिवने यांनी सहभाग नोंदवला. कवितेच्या मध्यमातून फुले शाहू आंबेडकरी विचारांचा जागर घातला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकल्प अधिकरी तुषार सुर्यवंशी यांनी केले आभार सहा. प्रकल्प अधिकारी सरिता महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी सुनीता झाडे, प्रकल्प समन्वयक नागेश वाहुरवाघ, खुशाल ढाक, मंगेश चहांदे यांचे सहकार्य लाभले.